हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. रात्रभर मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्याला झोडपले. पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसला. अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे.
दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने कालच याबाबतचा इशारा दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यातही आगामी तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. दरम्यान पुणे शहर परिसरासाठी आज पावसाचा यलो तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागानं मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं पावसाच्या सरी कोसळल्यास शेतकऱ्यांची पिक वाचतील, असं हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सांगितलं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.