आज दि. १३ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

स्वीस बँकेतील भारतीयांच्या खात्याची
माहिती केंद्र सरकारला मिळणार

भारताचा स्वीत्झर्लंडसोबत झालेल्या ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन पॅक्ट (एईओआय) या करारांतर्गत भारताला या महिन्यात स्विस बँक खात्याच्या विवरणाचा तिसरा सेट मिळणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. त्यामध्ये भारतीय नागरिकांची तिथे असलेल्या स्थावर मालमत्तांची आकडेवारी प्रथमच मिळणार आहे. परदेशात भारतीय नागरिकांचा कथितरित्या जमा असलेल्या काळ्या पैशांविरोधात केंद्र सरकारच्या लढाईत हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. या महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांचे फ्लॅट, अपार्टमेंट आणि संयुक्त मालकीच्या स्थावर मालमत्तांची पूर्ण माहिती प्राप्त होणार आहे.

भूपेंद्र पटेल यांनी घेतली
गुजरात मुख्यमंत्रीपदाची शपथ

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरातमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. भूपेंद्र पटेल यांनी आज (सोमवार) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल झालेला नाही.

साकीनाका बलात्कार प्रकरणी
पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत

मुख्यमंत्र्यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी शासकीय योजना जाहीर केली आली आहे. मुख्यमंत्री निधीतून आणि शासकीय योजनांमधून पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे,” यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत तपासाबाबत माहिती दिली आहे.

केरळमध्ये निपाह, उत्तर प्रदेश,
महाराष्ट्रात डेंग्यू मुळे चिंता

देशात दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक प्रमाणात आढळत असल्याने तिस-या लाटेचा धोका टळलेला नाही. परंतु देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान उभे ठाकले आहे. उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंतच्या राज्यात वेगवेगळ्या तापांचे रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये निपाह विषाणू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात डेंग्यू, दिल्लीमध्ये विषाणूजन्य आजार आणि बिहारमध्ये मलेरियाच्या प्रादुर्भावामुळे तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

देशात आतापर्यंत
74.38 कोटी लसीकरण

देशव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 74.38 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 27,254 नवीन रुग्णांची नोंद. – देशभरातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचं प्रमाण 1.13%. भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 3,74,269. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.54% गेल्या 24 तासात 37,687 रुग्ण कोविडमुक्त, तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,24,47,032. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर (2.11%) सलग दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (2.26% ) गेल्या 14 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ परिवारावर शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. गेल्या काही दिवसापासून सोमय्या यांच्या रडारवर कोणते मंत्री असणार याबाबत उत्सुकता होती. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. यावेळी त्यांनी २७ पानांचे पुरावे असल्याचा आरोप केला आहे. ही सर्व कागदपत्रे प्राप्तिकर विभागाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत शेल कंपनीकडून मुश्रीफ यांच्या पुत्राने यांनी दोन कोटीचे कर्ज घेतल्याचेही म्हटले आहे. उद्या ईडीकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुश्रीफ परिवाराने साखर कारखान्यात काळा पैसा वळता केल्याचाही आरोप त्यांनी केला.

किरीट सोमय्यांवर अब्रूनुकसानीचा
दावा ठोकणार : मुश्रीफ

हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. “किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं. ते कोल्हापूरला आले असते, तर त्यांना स्पष्टपणे खरी परिस्थिती समजली असती”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. तसेच, किरीट सोमय्यांवर येत्या दोन आठवड्यांमध्ये १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ यांनी यावेळी नमूद केलं.

तालिबानी सरकार
पाकिस्तानला झिडकारले

पाकिस्तानने तालिबानी राजवटीत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तालिबानी सरकार पाकिस्तानला एक प्रकारे झिडकारले आहे. कारण दोन देशांच्या चलनाची देवाणघेवाण करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते, असा एका उच्चपदस्थ पाकिस्तानी मंत्र्याने केलेला दावा तालिबानने फेटाळला आहे. अफगाणीस्तान मधील नव्या तालीबानी सरकारने पाकिस्तानी रुपयामध्ये व्यवसाय करण्यास नकार दिला आहे. अफगाण सरकारचे शेजारील देशांमधील व्यवहार “अफगाणी” चलनात असतील, असे तालीबानने जाहीर केले आहे.

अडीच वर्षानंतर जेट एअरवेज
उड्डाणासाठी सज्ज

जेट एअरवेजची विमाने लवकरच विमानतळाच्या धावपट्टीवरून पुन्हा उड्डाण करताना दिसतील. कंपनीच्या मते, जेट एअरवेजची उड्डाणे २०२२ च्या पहिल्या आर्थिक तिमाहीपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करतील. तसेच सध्या परदेशी उड्डाणे केवळ कमी अंतराची असतील. एअरलाइनचे म्हणणे आहे की, ते फ्लाइट स्लॉट आणि इतर समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेटिंग फ्लाइटसाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

खाद्यतेलाच्या किमती
खाली येण्याची शक्यता

देशभरात खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने आयात शुल्क कमी केले आहे. यामुळे तेलाच्या किंमती तात्काळ खाली येतील अशी अपेक्षा आहे. आयात शुल्क घटल्याने सरकारच्या महसूलात घट होईल. सरकारने यापूर्वीही जून आणि जुलै महिन्यात अशी पावले उचलली आहेत. आयात शुल्कात कपात केल्यामुळे केंद्र सरकारच्या महसुलावर 3,500 कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे. भविष्यात आणखी परिणाम दिसण्याची शक्यता आहे. सरकारकडून सामान्य लोकांना 4600 कोटी दिले जातील, जे खाद्यतेलांवर थेट लाभाच्या स्वरूपात असतील.

शरद पवारांनी काँग्रेसच्या
झेंड्याखाली यावं : थोरात

काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असहमती दर्शविली आहे. तसेच पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं खुलं आवतनच बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. त्यामुळे थोरात यांच्या या आवतनावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
बाळासाहेब भिलारे यांचे निधन

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचे (वय ७२) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.