भूकंपबळी सहा हजारांवर; बचावकार्य तोकडे

तुर्कस्तानचा पूर्व भाग व लगतच्या सीरियात सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सहा  हजारांपेक्षा जास्त झाली आहे. कोसळलेल्या हजारो इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी मंगळवारी बचावकार्य पथकांचे प्रयत्न सुरू होते. बचाव मोहिमेदरम्यान आणखी  मृतदेह सापडल्याने भूकंपबळींची संख्या ६,२०० झाली आहे.

जगभरातील देशांनी येथे बचावकार्यासाठी पथके पाठवली. तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले, की आपत्कालीन बचाव पथकांचे २४ हजार ४०० हून अधिक कर्मचारी शोध व बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत. परंतु एकटय़ा तुर्कस्तानमध्येच सहा हजारांपेक्षा जास्त इमारती कोसळल्यामुळे बचाव पथके अपुरी पडत आहेत. येथे गोठणबिंदु खाली असलेले प्रतिकूल तापमान व सुमारे २०० भूकंपोत्तर धक्क्यांमुळे (आफ्टरशॉक) मदतकार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होत आहे. या खिळखिळय़ा झालेल्या इमारतींच्या अवशेषात भूकंपाचे धक्के बसत असताना शोधकार्य राबवणे जोखमीचे व धोकादायक बनले आहे.

‘आईचा आवाज ऐकू येतो, पण सुटका करता येत नाही..’

तुर्कस्तानातील हाताय प्रांताची राजधानी अंटाक्या शहरातील नुरगुल अताय यांनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली त्यांना त्यांच्या आईचा आवाज ऐकू येत होता. परंतु, योग्य उपकरणे व बचाव पथकाशिवाय आईची सुटका करण्याचे तिचे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. येथे कोसळलेल्या स्लॅबचा अडथळा हटवल्याशिवाय आईपर्यंत जाणे शक्य नाही. माझी आई ७० वर्षांची आहे. ती फार काळ अशा अवस्थेत राहू शकणार नसल्याचे हतबल नुरगुल यांनी सांगितले.

हाताय प्रांताच्या नैर्ऋत्य भागात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. येथे सुमारे १५०० वर इमारती कोसळल्या आहेत.  अनेक नागरिकांचे आप्तस्वकीय या ढिगाऱ्यांखाली अडकले असून, त्यांचा आक्रोश सुरू आहे. येथे मंगळवारी कोणतीही मदत किंवा बचाव पथक पोहोचलेले नव्हते.

अनेक जण निवाऱ्याविना 

सीरियातील ‘डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स’च्या मोहिमेचे प्रमुख सेबॅस्टिन गे यांनी सांगितले, की उत्तर सीरियातील आरोग्य सेवा केंद्रांत अनेक वैद्यकीय कर्मचारी दिवस-रात्र उपचार करत आहेत. मोठय़ा संख्येने जखमींचा ओघ सुरू आहे. तुर्कस्तानातील हाताय प्रांतात हजारो भूकंपग्रस्तांनी क्रीडा केंद्र- सभागृहांत आश्रय घेतला आहे. अनेकांनी उघडय़ावरच शेकोटी करून रात्र काढली.

भारतातर्फे दोन विमानांतून मदत रवाना

भूकंपग्रस्त तुर्कस्तानात भारताने तातडीने दोन विमानांतून मदतसामग्री आणि वैद्यकीय पथके पाठवली आहेत. तुर्कस्तान व सीरियाच्या विविध भागांत झालेल्या विनाशकारी भूकंपांमधून वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी भारताने विविध उपकरणे, साधने आणि वाहनेही पाठवली आहेत. जगभरातील अनेक देशांनी तुर्कस्तान व सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे.

मृतांची संख्या वाढण्याची भीती

  • भूकंप केंद्रापासून ३३ किलोमीटरवर (२० मैल) तुर्कस्तानची प्रांतीय राजधानी असलेल्या गॅझियानटेप शहरात भूकंपग्रस्तांनी व्यापारी संकुले, क्रीडा संकुले, मशिदी, समाजिक संकुलांत आश्रय घेतला आहे.
  • तुर्कस्तानचे उपाध्यक्ष फ्युएट ऑक्टे यांनी सांगितले की देशातील एकूण मृतांची संख्या आतापर्यंत तीन हजार ४१९ वर पोहोचला, तर २० हजार ५३४ जण जखमी झाले आहेत.
  • सीरियातील सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशातील मृतांची संख्या ८१२ वर पोहोचली आहे, तर सुमारे एक हजार ४५० नागरिक जखमी झाले आहेत.
  • आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशाच्या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात किमान ७९० जण मृत्युमुखी व २२०० हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती विरोधकांच्या ‘सीरियन सिव्हिल डिफेन्स’ व बचावकार्य करणारा गट ‘व्हाईट हेल्मेट’ने दिली. मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.