अमेरिकेने सोमवारी चीनच्या कथित हेरगिरी करणाऱ्या ‘बलून’चे अवशेष चीनला परत करण्यास नकार दिला. हे ‘बलून’ शनिवारी दक्षिण कॅरोलिनालगतच्या अटलांटिक महासागरात अमेरिकेने पाडले होते. गेल्या आठवडय़ात अनेक दिवस मोंटाना ते दक्षिण कॅरोलिनापर्यंत अमेरिकेच्या हवाई हद्दीत उडताना दिसलेल्या या चिनी ‘बलून’चे अवशेष गोळा करण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे.
‘व्हाईट हाऊस’तर्फे सोमवारी ठामपणे सांगण्यात आले, की ते हेरगिरी करणारेच ‘बलून’ असल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नियम आणि अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले, की अमेरिकी लष्कराने समुद्रातून ‘बलून’चे काही अवशेष मिळवले आहेत आणि शोध सुरूच आहे.
‘नॉर्दर्न कमांड’चे कमांडर जनरल ग्लेन व्हॅनहर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ‘बलून’ दोनशे फूट उंचीवर होते. त्यात काही हजार पौंड वजनाचे जेट विमानाच्या आकाराचे उपकरण होते. दरम्यान, बीजिंगहून आलेल्या वृत्तानुसार चीनने मंगळवारी स्पष्ट केले, की ‘बलून’ प्रकरणात चीन आपल्या कायदेशीर हक्क आणि हितांचे रक्षण समर्थपणे करेल.