आरोग्य विभागाचा क गटाचाही पेपर फुटला

आरोग्य भरती प्रक्रिया पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाचा गट ड प्रमाणे क गटाचाही पेपर फुटला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. आम्ही दोन एजंटांना काल अटक केल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. गट क च्या पेपरफुटीमध्ये न्यासा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत लिंक पोहोचत असून त्यांना देखील ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

गट क प्रकरणी पुणे पोलिसांनी काल दोघांना अटक केली आहे. गट ड पेपरफुटीचं कट क मध्येही कनेक्शन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गट ड परीक्षेसंदर्भात आम्ही 15 पेक्षा अधिक जणांना अटक केलीय तेच लोक गट कमध्ये सहभागी असल्याचं म्हणता येतं, असं अमिताभ गुप्ता म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार अधिकारी वर्गातून 400 ते 500 तर सॉफ्टवेअर कंपनीकडून 400 ते 500 लोकांपर्यंत पेपर पोहोचले असल्याची शक्यता आहे. तर, गट क साठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले असल्याचं अमिताभ गुप्ता म्हणाले.

गट क पेपरफुटी प्रकऱणात न्यासा कंपनीचं कनेक्शन समोर आल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. न्यासावरतीही गुन्हा दाखल झालाय,चौकशी करून न्यासातील संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. सॉफ्टवेअर कंपनीतील संबंधित व्यक्तींकडून 400 ते 500 जणांना पेपर दिला असल्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

गट ड आणि गट क परीक्षेप्रकरणी 25 जणांना अटक
31 ऑक्टोबर 2021 ला आरोग्य विभागाच्या गट कची परीक्षा झाली होती. त्यापूर्वी 24 ऑक्टोबरला गट क ची परीक्षा झाली होती. आरोग्य भरती, म्हाडा परीक्षा पेपर फुटी आणि टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी एकूण 25 आरोपी अटकेत आहेत. तिन्ही परीक्षा संदर्भात एकमेकांशी घोटाळ्यात ते सहभागी आहेत, त्यांच्याकडून काही माहिती आपल्याला मिळाली, काही मालमत्ता ही जप्त करण्यात आलीय, असं अमिताभ गुप्ता म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.