आज दि.२८ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक
आता पुढील वर्षी मार्चमध्ये

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या ८ दिवसांपासून ही निवडणूक कधी होणार? याच अधिवेशनात होणार का? कशी होणार? राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार? अशा अनेक मुद्द्यांवरून तर्क-वितर्क सुरू होते. मात्र, अखेर याबाबतचा निर्णय झाला असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात कालपासून पडद्यामागूनही अनेक घडामोडी घडत असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज राज्यपालांनी राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर दिलं आणि सगळी सूत्र फिरल्याची माहिती आहे.

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये
राजकीय घडामोडींना वेग

आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. एका माजी क्रिकेटरसह २ काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा समावेश आहे. त्यांनी मंगळवारी (२८ डिसेंबर) भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय काँग्रेसच्या २ आमदारांनीही भाजपात प्रवेश केला आहे.

भाजपचे खासदार म्हणतात, १५ लाख
रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार नाही

सध्या सोशल मीडियावर एका भाजपा खासदाराचा भ्रष्टाचारावर बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओत हे भाजपा खासदार १५ लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार नसल्याचं बोलताना दिसत आहेत. हे बोलताना ते सरपंचाच्या निवडणुकीतच एकावेळी ७ लाख खर्च येत असल्याचंही सांगतात. तसेच मागील खर्च, पुढील निवडणुकीच्या तयारीचा १४ लाख खर्च आणि महागाई धरून १ लाख असे एकूण १५ लाख भ्रष्टाचार चुकीचा नाही, असं त्यांनी सांगितलं. या भाजपा खासदारांचं नाव जनार्दन मिश्रा असं आहेत.

कोण अजित पवार? मी नाही
ओळखत : नारायण राणे

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना. त्यांचा काय संदर्भ देताय?, असा सवालच नारायण राणे यांनी केला.

एकदम 12-12 महिने कुणाला
बाहेर पाठवू नका : अजित पवार

कुणी जर चुकलं, तर त्याला 4 तास बाहेर ठेवा. 4 तास कमी वाटत असतील, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम 12-12 महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना केले. यापूर्वी भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झाले आहे. हे निलंबन मागे घ्यावे, अशी भाजपची मागणी आहे. या अनुषंगाने अजित पवारांनी सभागृहात आज भाजपच्या सुरात सूर मिसळला. सभागृहातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी,
झेंडा पडला सोनिया गांधींच्या हातावर

काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली. याला कुणी अपशकून म्हणेल, तर कोणी आणखी काही. मात्र, हे टाळता आले असते. त्याने काँग्रेसची नाहक होणारी नाचक्की, त्यातून उठणारी शब्दांची राळ, अन् हसे झाले नसते. मात्र, काही-काही घटनांची दोरी कुणाच्या हाती नसते, हेच खरे. त्याचे झाले काय की, काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली खरी. मात्र, तो झेंडा त्यांच्याच हातावर येऊन पडला. तेव्हा सारेच सैरभर झाले.

पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘टी-३५’
वाघिणाचा मृतदेह आढळला

राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘टी-३५’ वाघिणाचा मृतदेह आढळून आला आहे. व्याघ्र प्रकल्पातील सालेघाट रेंजमधील पाथर बीटमधील पाहणी दरम्यान या वाघिणीचा मृतदेह दिसून आला. काही असामान्य हालचालीचे वाघिणीचे व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर, आज एक निरीक्षण पथक संबंधित भागात पाठवण्यात आले होते. या पथकाला त्या ठिकाणी वाघिणी मृतावस्थे आढळून आली. विशेष म्हणजे वाघिणीच्या अंगावर कुठलीही जखम दिसून आली नाही.

आरोग्य विभागाचा
क गटाचाही पेपर फुटला

आरोग्य भरती प्रक्रिया पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाचा गट ड प्रमाणे क गटाचाही पेपर फुटला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. आम्ही दोन एजंटांना काल अटक केल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. गट क च्या पेपरफुटीमध्ये न्यासा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत लिंक पोहोचत असून त्यांना देखील ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

इरफान पठाणच्या घरी मुलाचा
जन्म, नाव ठेवले सुलेमान

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. इरफानची पत्नी सफा बेगने आज आणखी एका मुलाला जन्म दिला आहे. इरफान पठाणने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. “मला आणि सफाला मुलगा सुलेमान खानच्या जन्माची घोषणा करताना आनंद होतोय”, असे इरफानने सांगितले. सफा आणि मी आमच्या लहान मुलाचे सुलेमान खानचे स्वागत करतो. बाळ आणि आई दोघेही चांगले आणि निरोगी आहेत,” असे इरफान ट्विटरवर पोस्ट करून सांगितले.

राशीद खानची बडबड, मी भारताला कधीही हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही..

तेलंगणातील काँग्रेसचे नेते राशीद खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांवर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवरून टीका केली आहे. “भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,” असं राशीद खान यांनी म्हटलंय. मी भारताला कधीही हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही, असे राशीद खान म्हणाले. ते म्हणाले, “मी जिवंत असेपर्यंत भारताला कधीच हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.