शेअर बाजार १६०० हून
अधिक अंकांनी कोसळला
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्याच्या बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी विक्री होत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे.बीएसई सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी १७००० पर्यंत खाली आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी देखील ४८० हून अधिक अंकांनी घसरला आहे. दोन दिवसांत सेन्सेक्स २,४४८ अंकांनी घसरला आहे. या घसरणीदरम्यान टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
राज्यात तब्बल 674 अनधिकृत
शाळा आढळल्या
राज्यात तब्बल 674 अनधिकृत शाळा आढळून आल्या असून या शाळांवर शालेय शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातही बृन्मुंबईमध्ये सर्वाधिक 222 शाळा अनधिकृत आहेत. उद्योजक, व्यापारी, राजकीय पुढारी, व्यावसायिक यांनी प्रामुख्याने शाळा उभारल्या आहेत. यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळा उभारण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहेत. या शाळा विद्यार्थ्यांकडून मात्र भरमसाठ शुल्क वसूल करत असतात.
शिवजयंती उत्सवासाठी निर्बंध
काही प्रमाणात शिथील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे
काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं
केल्याबद्दल माफी मागावी : फडणवीस
कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही,” असं फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून ‘हमारा नेता कैसा हो, फडणवीस जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या. फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.
पंकजा मुंडे यांची बीडमध्ये
पुन्हा एकदा आघाडी
बीडमध्ये पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील पाच नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखलं. वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी, पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वडवणी नगरपंचायतीत भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
केंद्र सरकारचे ५४ हून अधिक चिनी
अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश
केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या अॕप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच अॕप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या अॕप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लाँच केलेले आहेत.
ब्रेकअप नंतर तरुणाला
तरुणीने जिवंत जाळले
नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणाऱ्या गोरख काशिनाथ बच्छाव या ३१ वर्षीय युवकाला मारहाण करत जिवंत जाळल्याची घटना शनिवारी घडली होती. कल्याणी गोकुळ सोनवणे या युवतीसोबत गोरखचे मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेम प्रकरणाला कल्याणीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले होते. गोरखने मात्र कल्याणी आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र कल्याणीच्या कुटुंबीयांनी गोरख सोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार देत कल्याणीचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडीत तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
SD social media
9850 60 35 90