सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात
उद्धव ठाकरेंची नोंद होईल
राज्यात १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून एकमेकावर टीका टिप्पणी केली जात आहे. अशाचप्रकारची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलीय. सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरेंची नोंद होईल असं निलेश राणे म्हणालेत.
राज्यात थंडीचा कडाका वाढणार,
धुळे जिल्ह्यात ५.५ अंश तापमानाची नोंद
संपूर्ण राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे, राज्यातील अनेक शहरे गारठली आहेत. आज म्हणजेच मंगळवारी राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे ५.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झालीय. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यातच आज ही निच्चांकी तापमानाची नोंद झालीय.थंडीच्या कडाक्यामुळे धुळेकर चांगलेच गारठल्याचे बघावयास मिळत आहे. पुढील ४८ तास धुळ्यामध्ये थंडीचा कडाका असाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
१५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात
१०० टक्के लसीकरण होणार
ओमायक्रॉन वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात असून, दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण होणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी बोलून दाखवले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. ओमायक्रॉन धोकायदायक नसल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
राज्य शासन करणार नोकर भरती,
900 पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध
राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना खुशखबर दिली आहे. आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 900 पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एमपीएससीकडून अधिकृत संकेतस्थळावर ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021’ साठी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा सामावेश आहे.
टीईटी गैरव्यवहार प्रकरणात
आणखी एका अधिकाऱ्याला अटक
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आल्यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सुखदेव डेरे यांच्याकडील कागदपत्रे, लॅपटॉपमधील माहितीवरुन ही लिंक पुढे आली आहे, असे अमिताभ गुप्ता म्हणाले. प्राथमिक अंदाजानुसार ५०० लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार पाच कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे.
पुन्हा एकदा कर्नाटकात
नेतृत्वबदलाची चर्चा सुरू
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतलेल्या बसवराज बोम्मई यांची पदावरून उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. २८ जुलै रोजी बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उचलबांगडीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. बसवराज बोम्मई यांनी केलेल्या एका विधानावरून जोरदार चर्चा सुरू झाली. कर्नाटकमध्ये ५ महिन्यांत पुन्हा एकदा नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराजांचा अवमान सहन
केला जाणार नाही : फडणवीस
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार बूट घालून महाराजांच्या पुतळ्यावर चढले होते याची आठवण करुन देत तेव्हा मूग गिळून गप्प का बसले होते अशी विचारणा केली.
कर्नाटकमध्ये वा कुठेही, महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासहीत त्यांचं वक्तव्य कसं फिरवलं गेलं हे दाखवलं. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबतही असं करणं निंदनीय असल्याचं त्यांनी सांगितलं.
जळगावात पैशाच्या पावसासाठी
महिलेला जिवंत जाळले
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. 21 व्या शतकात पैशाच्या पावसासाठी एका महिलेला जीवंत जाळण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील जळगावात घडला आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण गाव हादरलं आहे. जळगावात पैशाच्या पावसासाठी एका महिलेला जिवंत जाळण्यात आलं आहे. माया दिलीप फरसे असं मृत महिलेचं नाव आहे. त्या शिवाजी नगरमध्ये राहात होत्या. याप्रकरणी पोलिसांनी संतोष मुळीक या मांत्रिकासह मृत महिलेच्या भाच्याला अटक केली आहे.
ह्रदयात फार दु:ख, वेदना असतात,
तेव्हा आपण शाप देतो : जया बच्चन
तुम्ही मला सांगा की माणूस शाप केव्हा देतो? सभागृहात बसलेले आम्ही सगळे लोकांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही शुभेच्छा देऊ शकतो. पण ह्रदयात फार दु:ख, वेदना असतात, तेव्हा आपण शाप देतो. ही आपल्या भारताची परंपरा असते. ट्रकच्या मागे म्हटलं असतं ना, की बुरी नजर वाले, तेरा मुँह काला.. तो सुद्धा एक शापच आहे”, असं जया बच्चन म्हणाल्या.
WWE RAW मध्ये एका नव्या
भारतीय कुस्तीपटूची एन्ट्री
WWE ही लोकप्रियता भारतात आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच WWE RAWमध्ये एका नव्या भारतीय कुस्तीपटूची एन्ट्री झाली आहे, जो आता सुपरस्टार होणार आहे. वीर महान असे त्याचे नाव आहे. वीर महानचे खरे नाव रिंकू सिंग आहे, त्याची उंची ६ फूट ४ इंच आणि वजन २७५ पौंड आहे. रिंकू सिंगचा जन्म उत्तर प्रदेशातील गोपीगंज येथे झाला, त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. WWE रेसलिंगमध्ये सामील होण्यापूर्वी तो एक व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता.
SD social media
9850 60 3590