म्हैसूरमध्ये आयोजित जागतिक योग दिनाच्या मुख्य सोहळय़ाचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी या दिनानिमित्त देशवासीयांसह जगभरातील नागरिकांना शुभेच्छा देताना सांगितले, की योग समाज, राष्ट्र आणि विश्वासह अवघ्या ब्रह्मांडात शांती निर्माण होते. योगाविषयीची ही धारणा एखाद्याविषयी फक्त विचार असू शकतो. परंतु भारतातील संतांनी ‘यत् पिंडे तत् ब्रह्मांडे’ या मंत्रातून याला उत्तर दिले आहे. ऋषी, मुनी व आचार्याचे दाखले देत मोदी म्हणाले, की अवघ्या ब्रह्मांडाची सुरुवात आपल्या शरीर व आत्म्याद्वारे होते. म्हणजे आपल्यापासून ब्रह्मांडाचा प्रारंभ होतो. योगामुळे शांती निर्माण होते. ही शांती केवळ काही लोकांना नव्हे तर अवघ्या समाजाला मिळते. योग राष्ट्रांसह विश्वात शांती प्रस्थापित करतो. ब्रह्मांडातही शांती निर्माण करतो. याची सुरुवात स्वजागरूकतेद्वारे होते. त्यानंतर विश्वजागरूकतेकडे योगाची वाटचाल होते. जेव्हा आपण स्वत:विषयी व जगाविषयी जागरूक होतो, तेव्हा ज्या गोष्टी बदलण्याची गरज आहे, त्याचा शोध आपण स्वत:त आणि जगात घेऊ लागतो. मग ती दैनंदिन जीवशैलीतील आव्हाने असो अथवा जल-वायू परिवर्तनासारखी जागतिक आव्हाने अथवा जागतिक संघर्ष असो, असे सांगून मोदी म्हणाले, की योगामुळे आपल्याला या आव्हानांची जाणीव होते, त्यांना तोंड देण्यासाठी आपण सक्षम व करुणावानही बनतो. त्याप्रमाणचे योग देशांना जोडतो. समस्यांतून मार्ग काढण्यास मदत करतो. योग ही भारतीय संस्कृतीची जगाला मिळालेली देणगी आहे. आज जगभरात योग लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आता तो बहुसंख्यांची जीवनशैली झाला आहे. योग समस्त जगाला फक्त आरोग्याचा मार्ग दाखवत नाही, तर अखिल मानवतेसाठी एक वैश्विक पर्व बनले आहे. काही वर्षांपूर्वी योग घरांत आणि आध्यात्मिक केंद्रांत सीमित होता. आता तो जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला आहे. भारतातील ज्या आध्यात्मिक केंद्रांनी योग-ऊर्जेचे पोषण केले, ती योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याची दिशादर्शक बनली आहे. अवघ्या मानवी समाजात निरोगी जीवनविषयक विश्वास योगाने निर्माण केला आहे, असे मोदी म्हणाले.