आज दि.२६ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

‘तेव्हा’ एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर करायचं होतं, शिवसेनेच्या नेत्याचं खळबळजनक विधान

आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे खळबळ उडाली आहे. ठाकरे गट एकनाथ शिंदे यांचं एन्काऊंटर करणार होता, ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती, असं खळबळजनक वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.संजय राऊत आमच्या पक्षाला मानतात की नाही मानत याने काही फरक पडत नाही. आम्हाला निवडणूक आयोगानं अधिकृत मान्यता दिली आहे. आमचे कोंबड्याचे खुराडे नसून, आमच्या मानेवर चाकू देखील नाही. भाजपने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन आमचा सन्मान केला आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

JioCinema चा रेकॉर्ड, पहिल्या 7 आठवड्यात 1500 कोटींहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज

जिओ सिनेमा हा आयपीएल 2023 चा अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर आहे. या प्लॅटफॉर्मवर खेळाच्या ह्यूअरशिपच्या बाबतीत त्याने जागतिक विक्रम मोडला आहे. पहिल्या सात आठवड्यांत आयपीएलला 1500 कोटींपेक्षा जास्त व्हिडिओ व्ह्यूज मिळाले आहेत.चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी पहिली क्वालिफायर मॅच झाली. या वेळी पुन्हा एकदा आयपीएलमधली सर्वाधिक दर्शकांची संख्या जिओ सिनेमाने गाठली. दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कॉन्करन्सी 2.5 कोटींपर्यंत वाढली. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घातल्याचं यावरून दिसून येतं.

समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डी ते भरवीर या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण झालं आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचे आगमन थेट हेलिकॉप्टर मधून समृद्धी महामार्गावर आगमन झाले. महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर आता सहा तासांत पूर्ण करता येणार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. काल परवा सुप्रीम कोर्टाने सरकारचा मार्ग मोकळा केला. तसा आम्ही समृध्दी महामार्ग मोकळा केला. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. घरात बसून चर्चा करत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना चिमटा काढला आहे. पुढे ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली. पंतप्रधानांनी सगळे अडथळे दूर केले म्हणून 600 किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो. हा शेतकऱ्यांचं भविष्य घडणारा रस्ता आहे. आम्ही चार तासात पोहोचलो. तुम्ही पाच तास घ्या पण सुरक्षेची काळजी घ्या असे आवाहन करत भविष्यात असेच प्रकल्प करायचे आहेत, हे सर्वसामान्य जनतेच सरकार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर पुण्यात लव जिहाद केस समोर?

‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लव जिहाद हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली असल्याचा दावा भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये एका मुस्लिम युवकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन चार वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबांची भेट घेत पोलिसांना याप्रकरणी गंभीर कारवाई करण्याच्या सूचना केल्यात तर पोलिसांनी सुद्धा आरोपीला अटक केली आहे. परिणामी हे प्रकरण तापणार असल्याची शक्यता आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील यावरुन लक्ष्य केलं आहे.

अबू सालेमचा भाचा मुंबईत अटक

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाचा आरिफ याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. फूटपाथवरील एका चहाच्या टपरीसमोर उभा राहून तो चहा पित होता. तेवढ्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पथकाने धाड मारली आणि आरिफला पकडलं. फरार माफियांच्या यादीत आरिफचं नाव समाविष्ट केल्यापासून तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या रडारवर होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. पण तो हाती लागला नव्हता. अखेर तो मुंबईत पोलिसांच्या हाती लागला.उत्तर प्रदेश पोलिसांनी आरिफला वांद्रे हिल रोडजवळ पकडलं. पोलीस गेल्या अनेक महिन्यांपासून आरिफच्या शोधात होता. पोलिसांना चकमा देत तो मुंबईत पोहोचला आणि काही दिवसांपासून तो मुंबईतचं राहात होता.

‘नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावं,’ ही मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबत सुरू असलेल्या वादाशी संबंधित जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर स्वतःहून सुनावणी करण्यास नकार दिला. याचिका फेटाळून लावत न्यायालयाने म्हटले की, ही याचिका का दाखल करण्यात आली हे आम्हाला माहीत आहे. अशा याचिकांकडे लक्ष देणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. या याचिकेचा फायदा कोणाला होणार? यावर याचिकाकर्त्याला नेमके उत्तर देता आले नाही. नव्या इमारतीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून लोकसभा सचिवालयाला निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांनी भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर घातली बंदी

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियातल्या विद्यापीठांनी बंदी घातली आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरचा समावेश आहे. व्हिसा फ्रॉडची प्रकरणं वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हिक्टोरिया या ठिकाणी असलेली फेडरेशन युनिव्हर्सिटी आणि वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीने भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.

दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन वर्षभरानंतर तुरुंगाबाहेर येणार

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी (२६ मे) वैद्यकीय आधारावर सत्येंद्र जैन यांना ६ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. ते मे २०२२ पासून मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.सत्येंद्र जैन यांना त्यांच्या आजारपणावर खासगी रुग्णालयात उपचार घेता यावेत यासाठी ६ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने ठरवलेल्या अटीही लागू केल्या आहेत. याशिवाय जामीन मिळाल्यानंतर सत्येंद्र जैन यांनी माध्यमांकडे जाऊन या प्रकरणाविषयी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये आणि साक्षीदारांना प्रभावित करू नये, असेही निर्देश दिले.

राहुल गांधींचा ३ दिवस अमेरिका दौरा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ३० मेपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाण्याचे नियोजन आहे. मात्र त्यांच्या पारपत्रासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत न्यायालय आज, शुक्रवारी देणार असलेल्या निर्णयावर त्यांचा हा दौरा अवलंबून असणार आहे.  तीन दिवसांच्या या दौऱ्यात राहुल गांधी अनिवासी भारतीय समुदाय, उद्योजक आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत. सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी आणि न्यू यॉर्क या शहरांमध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मात्र अखेरच्या क्षणी उद्भवलेला कायदेशीर अडथळा काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरला आहे. खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे राजनैतिक पारपत्र ‘सरेंडर’ केल्यानंतर ‘सामान्य पारपत्र’ मिळण्यासाठी मागितलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राबाबत दिल्लीचे एक न्यायालय आज, शुक्रवारी निर्णय देणार आहे. या दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, राहुल हे सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी आणि न्यू यॉर्क येथे दोन दिवस घालवणार आहेत. ३० मे रोजी सांता क्लॅरा येथील सांता क्लारा मॅरियटमध्ये ते अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.

डेहराडून-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू

अनेक आव्हाने असतानाही भारताने गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे आपली अर्थव्यवस्था बळकट केली आहे त्याचे जग कौतुक करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्ली- डेहराडून वंदे भारत एक्स्प्रेसचे दूरसंवादाद्वारे उद्घाटन करताना सांगितले.  उत्तराखंडमधील रेल्वेमार्गाच्या शंभर टक्के विद्युतीकरणाचेही पंतप्रधानांनी या वेळी उद्घाटन केले. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली उत्तराखंडसाठीची अशा प्रकारच्या या पहिल्या गाडीमुळे डेहराडून आणि राष्ट्रीय राजधानीदरम्यानचा प्रवास साडेचार तासांमध्ये करता येणार आहे.

‘पोन्नियिन सेल्वन: २’ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित; चित्रपट पाहण्यासाठी मोजावे लागणार ‘एवढे’ रुपये

दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: २’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला. साऊथच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन-२’ देखील सामील झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, हा चित्रपट पाहण्यासाठी ओटीटी प्रेक्षकांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.या चित्रपटाचे OTT प्लॅटफॉर्म रिलीझ हक्क Amazon Prime Video कडे आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना ३९९ रुपये मोजावे लागतील. OTT प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचे मोफत स्क्रिनिंग कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना ‘PS 2’ च्या ओटीटी रिलीजसाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. PS-1 आधीपासून Amazon Prime वर हिंदीमध्ये उपलब्ध आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.