कोरोना विषाणूनं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. कोरोना विषाणूचा उद्भाव झाल्यापासून विषाणू सातत्यानं आपल्या रुपात बदल करत आहे. कोरोना विषाणूची नवीन रुपं अधिकाधिक घातक ठरत आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिअंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक प्राणघातक विषाणू येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ संशोधन करत आहेत. या व्हेरिअंटबाबत अद्याप पूर्णपणे संशोधन झालं नाही. पण हा विषाणू सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून जगाची चिंता वाढवली आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरिअंट समोर आला आहे. डेल्टा व्हेरिअंटच्या धोक्याबद्दल फारसं जागरूक नसलेल्या भारतीय समाजात हा विषाणूनं वेगानं पसरला आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिअंट इतर व्हेरिअंटच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत, शिवाय डेल्टा व्हेरिअंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले नागरिकदेखील डेल्टा व्हेरिअंटच्या विळख्यात सापडत आहेत. हा विषाणू लसीकरणामुळे मानवी शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला सहजपण चकमा देऊ शकतो. चीनी संशोधकाच्या मते डेल्टा विषाणू हा कोरोना विषाणूच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे. लस न घेतलेल्या नागरिकांमध्ये जितका “व्हायरल लोड” आहे, तितकाच ‘व्हायरल लोड’ लस घेतलेल्या नागरिकांमध्ये आढळला आहे. पण यावर अद्याप संशोधन पूर्ण झालं नाही.