जिल्ह्यात कमलापुरच्या जंगलात एकाच आठवड्यात मरण पावलेल्या दोन्ही हत्तींचा मृत्यू हर्पीस या व्हायरसमुळे झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. जगातल्या बहुतांश हत्तींच्या आजाराला हाच व्हायरस जबाबदार असण्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कमलापुर येथे शासकीय हत्ती कॅम्प असून या हत्ती कॅम्पमध्ये गेल्या वर्षभरात तीन हत्तींचा मृत्यू झाला आहे. यातील दोन मृत्यू गेल्या आठवडाभरातच झाल्यानं चिंतेत आणखीच भर पडली आहे.
गेल्या तीन ऑगस्ट रोजी सई या तीन वर्षाच्या हत्तीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला एक आठवडा लोटण्यापूर्वीच आता शनिवारी अर्जून या हत्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हत्तीचे शवविच्छेदन चार जणांच्या वैद्यकीय पथकाने केले. यानंतर हत्तीच्या मृत्यूचं प्राथमिक कारण हर्पीस व्हायरस असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अहवालात नमुद करण्यात आलं आहे. अर्जुनसह सई हत्तीचा मृत्यूही हर्पीस या अतितीव्र आजारानेच झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हर्पीस व्हायरस हा जगाभरातील हत्तींच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरत असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या अतितीव्र आजारामुळे अवघ्या 8 ते 24 तासात हत्तीचा मृत्यू होतो. हा आजार प्रामुख्याने हत्तीच्या पिल्लांमध्ये गंभीर स्वरुपात आढळत आहे. वनविभागाने याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. शवविच्छेदनामध्ये घेण्यात आलेल्या अवयवांचे नमुने फोरॅन्सिक लॅब नागपूरसह हरपिस लॅब केरळ येथे पाठवण्यात आले आहेत.