मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्याला पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज नाशिकच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. गेल्या पाच वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला.
नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
कोकणातील वादळग्रस्तांसाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पॅकेज जाहीर केलं तरी लोकांपर्यंत मदत पोहोचत नाही, असं सांगतानाच आता पूरग्रस्तांसाठी मनसे 100 ते सव्वाशे ट्रक मदत साहित्य पाठवत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवसेनेने मदत करण्याआधीच जाहिरात केली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कोकणाला फटका बसला आहे. मदत करण्यासाठी आपल्याकडे काहीच एसओपी नाही. हे प्रशासनाचं अपयश आहे. प्रशासन कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना देत नाही, असं ते म्हणाले.