अमेरिकेच्या केंटकी राज्यात आलेल्या चक्रीवादळा मुळे किमान 50 लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त होतेय. राज्याचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी ही माहिती दिलीय. बेशियर म्हणाले, की चक्रीवादळामुळे 50हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची चर्चा आमच्यापर्यंत आलीय. बहुतांशी नुकसान ग्रेव्हज काउंटी(Graves County)मध्ये झालंय. यामध्ये मेफिल्ड शहराचा समावेश आहे. त्यामुळे मेफिल्ड(Mayfield City)मध्ये मोठ्या प्रमाणत विद्ध्वंस झाला.
रात्री अमेरिकेच्या मध्यवर्ती भागात चक्रीवादळ आलं. राज्यपाल म्हणाले, की नागरिकांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी पाण्यानं भरलेले दोन ट्रॅक्टर-ट्रेलर मेफिल्डकडे पाठवले. बेशियर यांनी नॅशनल गार्ड तैनात करून रात्रभर आणीबाणीची स्थिती घोषित केली. ते म्हणाले, की मेफिल्डमध्ये आमचा कारखाना आहे. त्याचं छत कोसळलंय. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या इमारतींमध्ये ग्रेव्हज काउंटी कोर्टहाऊस आणि शेजारील तुरूंगाचा समावेश आहे. यूएस जनगणनेनुसार, मेफिल्ड सुमारे 10, 000 लोकसंख्येचं शहर आहे.
NOAA या वादळाचा पूर्वानुमान वर्तविणाऱ्या संस्थेच्या मते, आर्कान्सा, इलिनॉय, केंटकी, मिसुरी आणि टेनेसी या पाच राज्यांमध्ये किमान 24 चक्रीवादळांची नोंद झाली आहे. आर्कान्साच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, किमान दोन जणांचा मृत्यू झालाय. आठवड्याच्या शेवटी हवामान अधिक खराब होण्याची शक्यता आहे, कारण चक्रीवादळ पूर्वेकडे जाईल. चक्रीवादळ शनिवारी पहाटे उत्तर लुईझियानापासून दक्षिणेतल्या ओहायोकडे जाऊ शकतं. ईशान्य आर्कान्सासमधल्या मोनेट इथं शुक्रवारी चक्रीवादळामुळे एका नर्सिंग होमचं नुकसान झालं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर किमान 20 लोक जखमी झाले.
चक्रीवादळाव्यतिरिक्त जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारपीट होऊ शकते. त्याचवेळी चक्रीवादळामुळे 2.4 लाख नागरिकांना अंधारात राहावं लागलं. शुक्रवारी आर्कान्सास ते इंडियानापर्यंतच्या हवामानाचा इशारा देण्यात आला. मात्र, वादळाची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत पूर्व अमेरिकेच्या बहुतेक भागांना पावसाचा फटका बसेल. NOAAच्या अंदाजानुसार, ओहायो आणि टेनेसी खोऱ्यांमधून उत्तर आखाती राज्यांमध्ये जोरदार वादळं येऊ शकतात. याशिवाय वादळी वारे, गारपीट आणि आणखी एक चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.