जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते. दरम्यान, जयंत पाटील यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यांच्या ईसीजी रिपोर्टमध्ये काही फरक जाणवला आहे. अन्य सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचं टोपे यांनी सांगितलं. मात्र, उद्या त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे.

जयंत पाटील यांना मंत्रिमंडळ बैठकीत थोडी अस्वस्थता जाणवत होती. मुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत रुग्णालयात नेण्यास सांगितलं. आम्ही तातडीनं रुग्णालयात पोहोचलो. जयंत पाटील यांची प्रकृती चांगली आहे. ईसीजीमध्ये काही बदल जाणवतोय. 2 डी इको, बल्ड टेस्टही नॉर्मल आहे. मात्र उद्या अँजिओग्राफी केली जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपली प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली आहे. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका असंही जयंत पाटील म्हणाले.

‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाल्यामुळे चर्चा सुरु झाली होती.

सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना देत पाहणी केली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं. अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.