राज्यातील महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडलीय. या बैठकीत चांगली कामगिरी नसलेल्या नागपुरातील भाजप नगरसेवकांना नारळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
साडेचार वर्षात सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक प्रभागात फिरकलेच नाहीत. भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन ४० ते ५० नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गडकरी-फडणवीसांच्या बैठकीतनंतर भाजपच्या नगरसेवकांची झोप उडाली आहे.
निवडणुकीत भाजप 25 ते 30 टक्के उमेदवार बदलणार आहे. त्यामुळे नागपूरमधील भाजप नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. तिकीट कट होणाऱ्या उमेदवारांमध्ये आपला नंबर लागू नये, अशी इच्छा सगळेच भाजप नगरसेवक मनोमन व्यक्त करत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपचे 151 पैकी 108 नगरसेवक निवडून आले होते.
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.नागपुरात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.
समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना भाजप वगळणार आहे. तीनच्या प्रभाग पद्धतीचं स्वागत करताना, नागपूर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेतील भाजपचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी तीनच्या प्रभाग पद्धतीचं स्वागत केलंय तसंच त्यांनी पक्षाच्या निर्णयाची माहिती दिलीय.