नागपूरच्या कामठी मार्गावरील एका शाळेत विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं शाळा व्यवस्थापन समितीनं आठ दिवसांसाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. शाळेत निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. कोरोनाबाधित विद्यार्थ्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आलंय.
शाळा व्यवस्थापन समितीनं 17 ते 23 डिसेंबरपर्यंत पुन्हा शाळा बंद ठेवली आहे. पूर्वीप्रमाणेच शाळांचे वर्ग हे ऑनलाईन सुरू राहणार असल्याचं शाळा व्यवस्थापन समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार 15 जुलैला ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्यात. 20 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 8 वी व शहरी भागातील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू झाल्या. सीबीएसई शाळांनीही त्याचे पालन करीत शाळा सुरू केल्या. दरम्यान शाळा सुरू झाल्यावर 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यास मंजुरी देण्यात आली होती. याशिवाय कोरोना नियमांचे पालन करीत, शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये असलेला हा विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. दरम्यान त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. तो कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आलंय. संपूर्ण शाळेचं निर्जंतुकीकरण केलं आहे. तसेच शाळा एक आठवडा बंद राहणार आहे.
नागपुरातला ओमिक्रॉनबाधित रुग्ण बरा झालाय. पण, इयत्ता 1 ते 7 चे वर्ग सुरू होताच दुसर्याच दिवशी 17 डिसेंबरला डीपीएस शाळेतील इयत्ता दहावीतील 15 वर्षीय विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला. सोबतच त्याच्या वडिलांचाही अहवाल सकारात्मक आढळून आलाय. हा विद्यार्थी महापालिकेच्या हद्दीतील रहिवासी आहे. देशात ओमिक्रॉन या विषाणूच्या व्हेरिएंटचा शिरकाव झालाय. अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 15 दिवसांपूर्वी दोनवर असलेली रुग्णसंख्या पाहता 70 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, केरळ, गुजरात, दिल्ली, चंदीगढ, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. पुणे, मुंबई, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.