भारतीय महिला ज्युदोपटू तुलिका मानचे बुधवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. महिलांच्या ७८ किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्यात तिचा पराभव झाला. अंतिम फेरीत स्कॉटलंडची गतविजेती अॕडलिंग्टनकडून तुलिका पराभूत झाली. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.
अंतिम सामन्यात तुलिकाने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिला कामगिरीमध्ये सातत्य राखता आले नाही. परिणामी, तिचा पराभव झाला. अंतिम सामन्यात पोहचण्यापूर्वी तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजचा पराभव केला होता. तर, उपांत्यपूर्व फेरीत तिने मॉरिशसच्या ट्रेसी डरहोनचा पराभव केला होता.
यापूर्वी, सुशीला देवी लिकमाबम आणि विजय कुमार यादव यांनी ज्युदोमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सुशीला देवी लिकमाबम हिने ज्युदोच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते. सुशीला अंतिम सामन्यात तिला दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबोईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
विजय कुमार यादवने ज्युदोमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 60 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्याला रेपेचेज सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. तिथे त्याने कांस्यपदक जिंकले.