जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. जळगाव शहरातील नवीपेठेत गोलाणी मार्केटजवळ हा संतापजनक प्रकार घडला. शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने किर्तीकुमार चोरडिया नामक व्यक्तीच्या आईस्क्रीम पार्लरमधून शीतपेय व खाद्यपदार्थ घेतले. पण पैसे न देताच तेथून काढता पाय घेतला. यावेळी दुकानदाराने पैशांची मागणी केली असता त्याला फरफटत नेण्यात आलं. या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत.
शीतपेय व खाद्यपदार्थ घेतलेली महिला कारमधून निघून जात असल्याचे पाहून चोरडिया यांनी पैसे मागण्यासाठी त्यांच्या मागे धाव घेतली. आपण पैसे देणार नाही, असे उत्तर महिलेकडून चोरडिया यांना मिळाले. त्यामुळे ते संतप्त झाले. मात्र यावेळी कारचालकाने कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरडिया कारसोबत फरपटत गेले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने ते कारच्या चाकाखाली येण्यापासून वाचले.
आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने कारचालकाने कार थांबवली. त्याठिकाणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्याचा आरोप चोरडिया यांनी केला. त्या संबंधित महिलेने आपण पैसे दिल्याचा दावा केला. मात्र, चोरडिया यांनी आपल्याला पैसे दिले नसल्याचे सांगितले. आपण दुकान सुरू ठेवल्याने आपल्यासोबत हा प्रकार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रकरणावर पडदा टाकला
दरम्यान, हा प्रकार अंगाशी येत असल्याचे पाहून शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते त्याठिकाणी जमले. त्यांनी चोरडिया यांची समजूत घालून वादावर पडदा टाकला. नंतर चोरडिया यांना बिलाचे पैसेही मिळाले. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, जनमानसातून संताप व्यक्त होत आहे.