तब्बल 71 सुरुंग तसेत इतर कित्येक स्फोटकं शोधून काढणारा मागवा नावाचा उंदीर निवृत्त झाला आहे. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्याने ही कामगिरी करुन दाखवली आहे. मात्र, आता वयोमानानुसार तो थकला असून त्याची सुरुंग शोधण्याची शक्ती कमी होऊ लागली आहे. याच कारणामुळे हा उंदीर आता सेवेतून निवृत्त झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मागवा या उंदराला नोंदणीकृत असलेल्या अपोपो (Apopo) नावाच्या चॅरिटने प्रशिक्षण दिले आहे. ही संस्था टांझानिया येथील असून तिने आतापर्यंत अशा अनेक उदरांना वाढवले आणि प्रशिक्षित केले आहे. प्रशिक्षित केलेल्या उंदरांना ही संस्था हिरो रॅट म्हणून संबोधते. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी या संस्थेकडून उंदरांना 1990 सालापासून प्रशिक्षण दिले जाते.
मागवा हा उंदीर सध्या निवृत्त झाला आहे. या उंदराविषयी सांगताना त्याला दिशानिर्देश देणाऱ्या मालेन (Malen) यांनी अधिक माहिती दिली आहे. “मागवाने आतापर्यंत अत्यंत चांगले काम केले. त्याने फत्ते केलेल्या सर्व मोहिमा या अतुलनीय होत्या. मी त्याच्यासोबत काम केल्याचा मला अभिमान आहे,” असे मालेन म्हणाल्या. तसेच मागवा हा दिसायला लहान असला तरी त्याने आतापर्यंत अनके लोकांचा जीव वाचवल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मागवा या उंदाराचे वजन 1.2 किलो असून तो फक्त 70 सेंटीमिटर लांब आहे. त्याची विशेषता सांगायची झाल्यास हा उंदीर इतर उंदरांच्या जातीपेक्षा हलका आहे. त्याच्या याच गुणधर्मामुळे त्याने अनेक माणसांचे जीव वाचवले आहेत. मागवा हा उंदीर एखाद्या सुरुंगावरुन चालला तरी स्फोट होत नाही. तसेच धातूचा कचरा टाळून त्यामधून सुरुंग शोधण्याची कला या उंदराला अवगत आहे. त्याची काम करण्याची क्षमता सांगायची झाल्यास एका टेनिस कोर्टएवढ्या मैदानातून तो अवघ्या 20 मिनिटांमध्ये सुरुंग शोधू शकतो.