ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आर अश्विनची तारीफ केली. चॅपेल यांनी अश्विनला सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज म्हटलं आहे. मात्र, भारताचा माजी फलंदाज तथा क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर इयान चॅपल यांच्या मताशी सहमत नाहीत. त्यांनी हे मानायला नकार दिला. संजय मांजरेकर यांनी काही उदाहरणं देत अश्विनपेक्षा आणखी गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट खेळ करण्याची क्षमता असल्याचं सांगितलं.
अश्विनपेक्षा इतर गोलंदाज कामगिरीने कसे उजवे आहेत, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न संजय मांजरेकर यांनी केला. ESPN क्रिक इन्फोच्या ‘रनऑर्डर’ या विशेष कार्यक्रमात मांजरेकर यांनी अश्विनच्या परदेशातल्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘रवींद्र जडेजा आणि अलीकडे दमदार कामगिरी केलेल्या अक्षर पटेल यांच्यासारख्या फिरकीपटूंनीही भारतीय मैदानांवर आपल्या बोलिंगने कमाल केलीय’, असं मांजरेकर म्हणाले.
मांजरेकर यांच्या मतावर चॅपेल यांनी वेस्ट इंडीजचे महान जलदगती गोलंदाज जोएल गार्नर यांची योगदानाची आठवण करून दिली. संघात इतर अनेक चांगले गोलंदाज असल्याने त्यांच्या विकेट कमी आहेत, परंतु त्याच्यामुळे त्यांच्यातली प्रतिभा कमी होत नाही. ते इतर खेळाडूंपेक्षा सरसच होते, असं चॅपेल म्हणाले.
जेव्हा लोक अश्विनला सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणतात, तेव्हा मला एक प्रॉब्लेम आगे. अश्विनने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया देशांमध्ये एकदाही पाच विकेट्स घेतल्या नाहीत. जेव्हा आपण भारतीय खेळपट्ट्यांवरील जबरदस्त कामगिरीकडे पाहतो तेव्हा तुमच्या नजरेसमोर जाडेजाचं नाव असायला हवं. जडेजाने गेल्या चार वर्षात जवळजवळ अश्विनच्या तोडीस तोड विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या मालिकेत अक्षर पटेलने अश्विनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.