आज दि.३१ अ़ॉक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या होणार फैसला? सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे देशाचं लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आहे. याप्रकणी आधी झालेल्या सुनावणीत ‘खरी शिवसेना कोणाची’, याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करेल, असं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटलं होतं. पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सुप्रीम कोर्टातच फैसला होणार आहे. उद्या 1 नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी होणार आहे.

गुजरातमधील पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली अटक, पुलाचं नूतनीकरण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बेड्या

गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याने १४० जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून या पुलाचे नुतनीकरण करणाऱ्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तानुसार, या पुलाचे नुतनीकरण ओरेव्हा या कंपनीने केले होते. तसेच या कंपनीवर यापूर्वीही अनेक पुलांचे अर्धवट बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला होता.

बच्चू कडू-रवी राणा वादावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान म्हणाले, “माझ्या एका कॉलवर…”

मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते, असा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान राणा यांना दिले होते. याप्रकरणी काल दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोघांच्या भेटीबाबत बोलताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, की आम्हाला सरकार बनवायचे आहे आणि तुमची साथ हवी आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी कोणता आर्थिक व्यवहार केला, हे म्हणणं चुकीचं आहे. इतरांचं मला माहिती नाही. मात्र, बच्चू कडूंवर अशा प्रकारचे आरोप लावणं चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जी लोक गुवाहाटीला गेली, ती पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेली, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रसिद्ध चिनी कंपनीने भारतातील इतर व्यवसाय केले बंद

शाओमी म्हणजेच रेडमी फोनच्या युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. तुम्ही Mi Pay आणि Mi क्रेडिट अॕप वापरत असाल, तर आता हे अॕप तुम्हाला वापरता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे चायनीज स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi कॉर्पोरेशनने भारतामध्ये आपला फाइनॅन्शिअल बिझनेस बंद केला आहे. अलीकडेच कंपनीने प्ले स्टोअर आणि देशात आपल्या अॕप स्टोअरमधून Mi Pay आणि Mi क्रेडिट अॕप काढले आहे. Mi Pay ने युजर्सना देशातील यूपीआय नेटवर्कवर ट्रान्झॅक्शनची परवानगी दिली होती, मात्र आता तीदेखील NPCI द्वारे स्वीकृत UPI अॕप्सच्या यादीतून काढून टाकली आहे.

‘रिक्षामधील आरसे काढून टाका’, महिलांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

जगभरात रोड अपघातामुळे होण्याऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रोड अपघातामुळे मरण पावतात. त्यामुळे रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षा हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. अपघातांची अनेक कारणं असतात. कधी चालकांचा बेशिस्तपणा तर कधी रस्त्यांची दुरवस्था प्रामुख्यानं अपघातांना कारणीभूत ठरते. मात्र, वाहनांना असलेले विविध प्रकारचे आरसेदेखील अपघातांना कारणीभूत ठरू शकतात, असं मत महाराष्ट्रातील एका एका स्वयंसेवी संस्थेनं (एनजीओ) मांडलं आहे.

एका स्वयंसेवी संस्थेनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य परिवहन अधिकाऱ्यांकडे एक याचिका पाठवली आहे. बहुतेक पुरुष ऑटोचालक हे ड्रायव्हरच्या समोर लावलेल्या ‘रिअर व्ह्यु मिरर’चा वापर प्रवासी महिलेकडे एकटक बघण्यासाठी किंवा रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांकडे पाहण्यासाठी करतात. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यातून अपघात होतात असं एक महत्त्वपूर्ण निरीक्षण या एनजीओने आपल्या याचिकेत दिलं आहे. हे टाळण्यासाठी रिक्षातील असे आरसे काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी एनजीओने केली आहे, असं वृत्त ‘द टाईम्स आॕफ इंडिया’ न प्रसिद्ध केलं आहे.

फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, केंद्राकडे बोट दाखवून अपयश झाकण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली जात आहे. ही टीका होत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचा दावा केला. यासाठी त्यांनी पुरावा म्हणून काही जुन्या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या. पण देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती खोटी असल्याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर ४२ धावांनी विजय, लॉर्कन टकरची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३१ वा सामना आज पार पडला. ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४२ धावांनी विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु आयर्लंडचा संघ १३७ धावांवर आटोपला. आयर्लंडकडून लॉर्कन टकरने एकाकी झुंज देताना अर्धशतक झळकावले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.