स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या स्वातंत्र्यदिनी देशभरातील प्रत्येक घरांवर आठवडाभर राष्ट्रध्वज फडकवून जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या या झेंडा बंधनामुळे देशभरातील सुमारे १० कोटी घरांवर फडकविण्यासाठी ध्वज तयार करणे, त्याच्या संहितेचे पालन करणे, वापरून झाल्यावर अवमान होणार नाही याची खबरदारी घेणे हे मोठे आव्हान असेल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान देशातील १० कोटी घरांवर सात दिवस राष्ट्रध्वज फडकविण्याचे ‘घरोघरी राष्ट्रध्वज’(हर घर झेंडम) अभियान राबविण्यात येणार असून राज्यात एक ते सव्वा कोटी घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी राज्य सरकारनेही आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षांत नागरिकांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सेनानी, देश रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे स्मरण करतानाच राष्ट्रप्रेम, देशभक्तीची भावना लोकांमध्ये जागृत करण्यासाठी यंदाचा स्वातंत्र्यदिन नेहमीपेक्षा वेगळय़ा पद्धतीने साजरा करण्याची कल्पना केंद्र सरकारने आखली आहे. त्यासाठी सलग सात दिवस घरांवर झेंडा फडकविण्याचा केंद्राचा आग्रह आहे.
मात्र, ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांना ध्वजसंहितेची तेवढी माहिती नाही. त्यामुळे सात दिवस सकाळी राष्ट्रध्वज फडकविणे आणि संध्याकाळी पुन्हा राष्ट्रध्वज उरविणे, राष्ट्रध्वज फाटणार नाही किंवा त्याचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.