आज दि.२७ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

केंद्रीय अर्थसंकल्प
यावर्षीही ‘पेपरलेस’ होणार

सलग दुसऱ्या वर्षी, वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी ‘पेपरलेस’ होणार आहे. करोनामुळे कामाच्या ताणामुळे तसेच सुरक्षिततेच्या कारणांमुळे सरकारने बजेटच्या प्रती छापणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकृत सूत्राने फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले. त्यामुळे बजेट डिजिटल स्वरूपात उपलब्ध करवून दिले जाईल आणि फक्त काही हार्ड कॉपी छापल्या जाणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

डॉ. अनिल अवचट यांचे
दीर्घ आजाराने निधन

वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मुक्तांगण’ या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

वाढत्या थंडीमुळे खानदेशात
केळी, पपई पिकांवर परिणाम

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठणार आहे.. आज राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं दिलीये. त्यामुळे किमान तापमान आणखी खाली कोसळण्याची शक्यता आहे. खान्देशात वाढत्या थंडीचा दुष्परिणाम केळी आणि पपई पिकावर होत असल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या लाटेमुळे पपई आणि केळी पीक खराब होण्याची भीती आहे.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात
शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. याचवेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांनी दिलासाही दिला आहे. कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही. शरण झाल्यानंतर नितेश राणे जामिनसाठी अर्ज करु शकतात.

ट्विटर वर राहुल गांधी
यांचे फॉलोअर्स घटले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचेही फॉलोअर्स घटले आहेत. यामुळे राहुल गांधी वैतागले असून त्यांनी याबाबत थेट मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी अग्रवाल सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केलाय.

मालेगाव काँग्रेसला मोठं खिंडार,
महापौरांसह २८ नगरसेवक राष्ट्रवादीत

मालेगाव महानगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. चक्क महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

ज्याच्यात दम आहे तो निवडून
येतो : गिरीश महाजन

भाजपा नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली असून ज्याच्याच दम असतो तो निवडून येतो असं म्हटलं आहे. “बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले; खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये हारले तर आता कारणं कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची असा प्रकार खडसे यांचा सुरू,” असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच
दिल्लीत महिलेवर बलात्काराची घटना

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच राजधानी दिल्लीत महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पीडित महिला आणि आरोपींमध्ये वैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले.

गडचिरोलीत भीषण अपघातात
भाजपा नेत्याचा मृत्यू

ट्रॅक्टरने कारला समोरासमोर दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात चामोर्शी येथील भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रासप नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे जखमी झाले आहेत. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ गुरूवारी हा अपघात झाला.

औषधी वनस्पतीच्या मागणीत
कोरोनाच्या काळात वाढ

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर अधिकचा भर दिला जात आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनाशी लढण्यामध्ये काय महत्वाचे आहे हे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे औषधी वनस्पतीच्या मागणीत वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये ही मागणी अधिक वाढलेली आहे. नर्सरीमध्ये औषधी वनस्पतीची टंचाई निर्माण होत असून यावरुनच मागणीचे स्वरुप लक्षात येत आहे. गेल्या दीड वर्षात गुळवेल सर्वाधिक मागणी वाढली आहे.

कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’
भत्ता मिळण्याची शक्यता

कोविड महामारीमुळे देशात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मुलांच्या शाळेपासून ते नोकरीपर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. नोकरदार वर्गाला घरातूनच काम करावं लागत आहे. पण ‘वर्क फ्रॉम होम’च्या या वाढत्या ट्रेंडमुळे नोकरदार वर्गाचे अनेक प्रकारचे खर्च वाढले आहेत. इंटरनेट, टेलिफोन, फर्निचर आणि वीज बिलांत मोठी वाढ झाली आहे.या अर्थसंकल्पात ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी वर्क फ्रॉम होमसाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम करप्राप्त रकमेतून वजावट म्हणून मिळण्याची शक्यता आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.