एमआयएमला यांनीच मोठं केले; राज ठाकरे यांचा शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप
पुण्यात आज गणेश कला क्रीडा मंच येथे सभेत बोलताना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. अयोध्या दौरा स्थगित केल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला राज ठाकरेंनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. राज ठाकरेंनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला. एमआयएमला यांनीच मोठं केल्याचं ते म्हणाले. “यांच्या राजकारणासाठी, हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदुंविरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात औरंगाबादमध्ये एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली”, असं राज ठाकरे म्हणाले.
‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या
कहाणीचा रचेता भाजपा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील सभेत त्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत गंभीर आरोप केले. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलेल्या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या गंभीर कहाणीचा रचेता दुसरं तिसरं कोणी नसून भाजपा आहे, असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं. त्यांनी व्हिडीओ ट्वीट करत आपली भूमिक स्पष्ट केली.
बेरोजगारांना रोजगार, जातीय सलोखा
या गोष्टींना महत्त्व देऊ या : अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणावं. आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय. मी काल देखील जळगाव जामवत, शहापूर, डहाणू, सिंदखेड राजा अशा ज्या ज्या ठिकाणी गेलो, तिथे माझी भूमिका तीच राहिली आहे. ज्याच्यातून महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार निर्माण होणार आहे, ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे, ज्याच्यातून कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा हाताळण्यात पोलिसांना मदत होणार आहे, त्या गोष्टीला देखील महत्त्व देऊ ना”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
घाबरलेला भोंगा संपूर्ण महाराष्ट्राने
बघितला : दीपाली सय्यद
शिवसेनेने झोप उडवली म्हणून राज ठाकरे यांना सकाळीच सभा घ्यावी लागली. आज घाबरलेला भोंगा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, अशी बोचरी टीका अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केली आहे. कार्यकर्त्यांवर केसेस होतील आणि अमित ठाकरे कुठेतरी लपून बसतील असा टोलाही दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. दीपाली सय्यद यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेवर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा
एकदा केले भारताचे कौतुक
अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाकडून अनुदानित तेल खरेदी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. भारत सरकार स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने हे साध्य करण्यासाठी काम करत आहे, असे इम्रान खान म्हणाले. त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) नेतृत्वाखालील सरकारची डोके नसलेल्या कोंबड्यासारखी अर्थव्यवस्था अशी टीका केली. मोदी सरकारने काल केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या घोषणेचे त्यांनी कौतुक केले.
आधी लुटणे आणि नंतर कमी पैसे
देण्यासारखे : पी. चिदंबरम
पी. चिदंबरम यांनी ट्विट करत या निर्णयावर टीका केली आहे. “दोन महिन्यांत १० रुपये प्रति लिटर वाढवा आणि पेट्रोलवर ९.५० रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर ७ रुपये प्रति लिटर कपात करा. हे आधी लुटणे आणि नंतर कमी पैसे देण्यासारखे आहे! अर्थमंत्र्यांनी राज्यांना केलेले आवाहन व्यर्थ आहे. जेव्हा त्यांनी केंद्रीय उत्पादन शुल्कात १ रुपयांची कपात केली तेव्हा त्या रुपयातील ४१ पैसे राज्यांच्या मालकीचे असतात. याचा अर्थ केंद्राने ५९ पैसे आणि राज्यांनी ४१ पैशांची कपात केली आहे. त्यामुळे बोटे दाखवू नका. जेव्हा केंद्र पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर कमी करेल (जे राज्यांसह सामायिक केलेले नाही) तेव्हा खरी कपात होईल,” असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले.
भारतीय लोकशाही ढासळली तर अवघ्या
जगासाठी समस्या ठरेल : राहुल गांधी
भारतातील लोकशाही जगाच्या हिताची असून, ती जणू जगासाठी जहाजाच्या नांगराप्रमाणे (स्थैर्य देण्याचे) काम करते. भारतीय लोकशाही जर ढासळली तर अवघ्या जगासाठी ती समस्या ठरेल,’’ असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करताना येथे दिला. भारतात दोन प्रकारची शासनपद्धती आहे. एक शासनपद्धती आवाज दाबणारी आहे व दुसरी शासनपद्धती आवाज ऐकणारी आहे. देशभरात रॉकेल पसरवले आहे. आता फक्त एक ठिणगी टाकण्याचा अवकाश आहे,’’ अशी भेदक टीकाही त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे केली.
श्रीलंकेतील आणीबाणी उठवली
श्रीलंकेत दोन आठवडय़ांपासून लागू केलेली आणीबाणी शुक्रवारी मध्यरात्री हटवण्यात आली. देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्याने हा निर्णय घेण्यात आला. देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे जीवनावश्यक वस्तू्ंच्या तीव्र टंचाईमुळे प्रचंड जनक्षोभ उसळल्याने सरकारविरोधी निदर्शने होत असल्याने आणीबाणी देशभर लागू करण्यात आली होती. अध्यक्ष गोतबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर महिनाभरात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही आणीबाणी उठवण्यात आल्याचे अध्यक्षांच्या सचिवालयातर्फे जाहीर करण्यात आले.
केंद्राने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केल्याचा राज्याला मोठा फटका! तिजोरीवर वाढला भार
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाईने हैराण झालेल्या जनतेला मोदी सरकारने काहीसा दिलासा देण्यात प्रयत्न केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची घोषणा केली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहे. याचा परिणाम केंद्रसोबत राज्याच्या तिजोरीवरही पडणार आहे. केंद्र शासनाने काल (शनिवार) पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
शेतकरी चिंतेत! राज्यात अद्यापही 17.5 लाख ऊस शिल्लक, अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर
राज्यात मागच्या कित्येक वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरू असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. साखर कारखाने जवळ असुनही उसाला तोड येत नाही तर भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक शेतातच वाळत असल्याचे चित्र आहे.दरम्यान राज्यात अद्यापही 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. हा ऊस कारखान्याला तुटून जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात अजूनही बीड, उस्मानाबाद, यासह 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.
आसाममध्ये महापुराचा हाहाकार 34 पैकी 31 जिल्हे पाण्याखाली, 18 जणांचा मृत्यू तर 7 लाख लोक बाधित
ईशान्येकडील एक प्रमुख राज्य म्हणून आसामची ओळख आहे. सध्या आसामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. भूस्खलन आणि पुराच्या पाण्याने राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. आसाममधील एकूण 34 जिल्ह्यांपैकी 31 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे राज्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सुमारे सात लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक-कार्तिकचं कमबॅक, रोहितच्या मित्राला धक्का
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी रोहित शर्मा , विराट कोहली , जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. तर दिनेश कार्तिक याचं तीन वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाबाहेर गेलेला हार्दिक पांड्याही दक्षिण आफ्रिका सीरिजमधून पुनरागमन करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी केएल राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे, पण शिखर धवनची मात्र निवडही करण्यात आलेली नाही. मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिजसाठी शिखर धवन टीमचा कर्णधार होता, पण यानंतर त्याची टी-20 टीममध्ये निवडही झाली नाही.
पुजारा पुन्हा आला! इंग्लंडच्या ‘टेस्ट’ साठी अशी आहे टीम इंडिया!
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडिया एकमेव टेस्ट मॅच खेळणार आहे. या सीरिजसाठी चेतेश्वर पुजाराचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत खराब कामगिरी केल्यानंतर पुजाराला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमधून बाहेर करण्यात आलं होतं, पण काऊंटी क्रिकेटमध्ये पुजाराने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्याचा टीम इंडियातल्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून खेळताना पुजाराने 7 इनिंगमध्ये त्याने 143.4 च्या सरासरीने 717 रन केले, यात त्याच्या नावावर दोन द्विशतकं आणि 4 शतकं होती.
SD social media
9850 60 3590