‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शो ने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. या कॉमेडी शो च्या माध्यमातून भाऊ कदम आणि कुशल बद्रिके घराघरात पोहचले. भाऊ आणि कुशल या दोघांच्या जोडीने आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय. ज्यांनी खळखळून लोकांचं मनोरंजन केलं, त्यांच्यावर संकट ओढावलं आहे.
भाऊ आणि कुशल या दोघांविरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पांडू सिनेमात पोलिसांची टिंगलटवाळी केल्या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचं समजतंय. भाऊ आणि कुशल या दोघांनी पांडू सिनेमात पोलीसाची भूमिका साकारली आहे.
सेटवर अनेक कलाकार स्क्रिपटसह तयारी करत बसलेले असताना पोलीस सेटवर आले. अचानक काय झालं म्हणून सर्वांचीच पाचावर धारण झाली. सेटवर आलेल्या पोलिसांनी भाऊ आणि कुशल विरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. त्यामुळे या दोघांना सेटवरुन बाहेर जावं लागलं. सेटच्या बाहेर या अभिनेत्यांचं पोलिसांसोबत चर्चा झाली. यानंतर ते सेटवर परतले.
भाऊ आणि कुशलने आपली बाजू पोलिसांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी आणि या दोन्ही अभिनेत्यांचं बोलणं सुरु असतानाच निलेश साबळेंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटलं पोलीस तुम्हाला घेऊन जातील का? घाबरु नका, हे खरे पोलीस नाही. हा प्रँक आहे, असं कार्यक्रमाचा दिग्दर्शक निलेश साबळेने सांगितलं. यानंतर भाऊ आणि कुशलच्या जीवात जीव आला. हा सर्व प्रकार कार्यक्रमाचाच एक भाग आहे. हा प्रँकचा व्हीडिओ जोरदार व्हायरल होतोय.