नागपूर मध्ये इंटर्न महिला डॉक्टरवर वैद्यकीय महाविद्यालयात गोळीबाराचा प्रयत्न

इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) च्या ई लायब्ररीजवळ काल सायंकाळी हा थरार घडला. एकतर्फी प्रेमातून फेसबुक फ्रेण्डने महिलेवर गोळीबाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यातून पीडिता बालंबाल बचावली.

सोमवार 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपुरातील मेडिकलच्या अधिष्ठाता इमारतीच्या शेजारी असलेल्या ई लायब्ररीजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित इंटर्न महिला डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून बोलत नसल्यामुळे संतप्त आरोपी विकी चकोले याने तिला भेटण्यासाठी मेडिकलमधील ई-लायब्ररीजवळ बोलावले होते.

आरोपी आणि पीडिता हे दोघे जण बोलत असताना अचानक कुठल्या तरी कारणावरुन त्यांच्यात खटके उडाले. त्यावरुन काही कळण्याच्या आतच आरोपीने खिशातून बंदूक काढली आणि तरुणीच्या दिशेने बंदूक ताणून धरली. त्याने बंदुकीचा ट्रिगरही दाबला होता. मात्र सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

महिलेने लगेच आरडाओरडा केला, तेव्हा जवळपास असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. परंतु आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. संबंधित पीडित महिला नागपूरच्या मेडिकलमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

दरम्यान, या प्रकरणी नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी विकी चकोले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं रवाना झाली आहेत. गोळीबाराच्या प्रयत्नामुळे मेडिकल परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.