परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक
दहावी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला खरा, पण या निर्णयाला राज्यात विविध ठिकाणी विरोध होत असून विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. मुंबईत धारावी परिसरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला तर नागपुरात आणि औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ऑफलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नागपूरच्या तुकडोजी चौकात आंदोलन केलं. आंदोलनाला हिंसळ वळण लागलं. विद्यार्थ्यांनी चौकात उभी असलेली एक बस फोडली.
आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचं
काम करू : बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं की, “खरंतर हिंदुस्थानी राजा म्हणून कोणीतरी या आंदोलनाची सुरूवात केली होती. नेमकं त्यांच्या मागण्या ऑनलाईन परीक्षा घेऊ नका किंवा रद्द करा परीक्षा अशा काही मागण्या आहेत. आपण निश्चितच त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि या आंदोलनाचं नेमकं कोणी नियोजन केलं हे पाहू. पण शिक्षण विभागाचं काम आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करू. कोणी त्याची मागणी करण्याची गरज नाही. शिक्षण विभाग यामध्ये परीपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचं भलं कसं होईल? त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया कसं जाणार नाही.”
महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री
होणार नाही : संजय राऊत
महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं संजय राऊत यानी सांगितलं. “त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात,” असाही टोला लगावला. महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
आर्थिक वर्षात ८ ते ८.५ टक्के
विकास दर राहण्याची शक्यता
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. आर्थिक सर्वेक्षणात, भारतीय अर्थव्यवस्था २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. देशाचा आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.
महाराष्ट्रातील जनतेसाठी वाईन
विक्रीचा निर्णय दुर्दैवी : अण्णा हजारे
महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न असल्याची टीका अण्णा हजारेंनी केलीय.
वैजापूरजवळ अपघात
चार वऱ्हाड्यांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरजवळ दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला आहे तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृत चौघेही नाशिकमधले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात घडला. वैजापूरजवळील शिवराय फाट्यानजीक दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार वऱ्हाडी ठार झाले असून ३० ते ३५ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींना वैजापूर येथीलच ग्रामीणसह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डासांमुळे दरवर्षी 10 लाखांहून
अधिक लोकांचा होतो मृत्यू
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आपले डोक वर काढत असतात. यावर नीट उपचार घेतले नाही तर, मृत्यू ओढावण्याचीही शक्यता असते. दरवर्षी डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांनी लाखो लोकांचे बळी जातात. मग प्रश्न पडतो आतापर्यंत आपण हे मृत्यू का रोखू शकत नाही. डासांचे संपूर्ण उच्चाटन केल्यास त्याचा काय परिणाम होईल, परंतु निसर्ग साखळीत प्रत्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून आहे.
राफेल नदालने जिंकले
ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद
राफेल नदालनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राफेलने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद जिंकलं आहे. सामन्यात राफेलने डॅनिलचा 2-6,6-7,6-4,6-4,7-5 असा पराभव केला. यासह राफेलने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचं जितेपेद जिंकलंय. राफेलची ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची ही 21 वी वेळ ठरली आहे.
नथुराम गोडसेची विचारधारा
प्रबळ होत चालली : तुषार गांधी
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या वेदना आज बाहेर आल्या आहेत, तुषार गांधी म्हणतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करणार्यांची संख्या देशात कमी होत आहे, तर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेची विचारधारा प्रबळ होत चालली आहे. महात्मा गांधी आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकारणादरम्यान राष्ट्रपिता यांचे पणतू तुषार गांधी यांचे वक्तव्य बाहेर आले आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना समाजात ‘द्वेषाचे विष’ पसरत असल्याचेही ते म्हणाले.
भावनगर एक्सप्रेसमध्ये प्रचंड
थरार, महिलेची चोरांशी झुंज
काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये प्रचंड थरार पाहायला मिळाला. कर्जत येथे गाडीत चार चोरांची टोळी शिरली. त्यानंतर या चोरांनी प्रवाशांचे सामान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवाशांनी चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. यावेळी चोराने एका महिलेची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने बॅग देण्यास नकार दिला आणि या चोरांशी झुंज दिली. चोरांनी महिलेला चाकू दाखवला. पण ही हिंमतबाज महिला तरीही चोरांना बधली नाही. तिने या चोरांना प्रतिकार केला. मात्र, चोरांनी या महिलेकडून बळाच्या जोरावर बॅग हिसकावून घेतली. तेवढ्यात एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांना फोन केला. पोलिसांनीही तात्काळ पाचही चोरांना अटक केली.
SD social media
9850 60 35 90