महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते चेक नाके उभारले आहेत. त्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील कसगी येथे सीमेवर कर्नाटक पोलिसांनी सीमा तपासणी चेक नाके उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला स्थानिक शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. उमरगा मतदार संघाचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आदेशानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले.
शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी याबाबत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली. कर्नाटकच्या या अतिक्रमण प्रकरणाने आगामी काळात या भागात वाद पेटणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या लगत महाराष्ट्र हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते सीमा तपासणी नाके उभे केले आहेत.
सीमा नाके हे नेहमी आपआपल्या राज्याच्या महसुली भागात उभारले जातात. मात्र गुलबर्गा जिल्हाधिकारी यांनी खासगी भागात पाहणी करत कर्नाटक शासनाच्या वतीने या भागात नव्याने कायमस्वरूपी सीमा तपासणी नाके उभे करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
या सर्व प्रकाराची माहिती मिळल्यानंतर आमदार चौगुले यांनी शिवसैनिकांना या भागात जाण्याचे आदेश दिले. त्यांनतर हा डाव तात्पुरता उधळला गेला. या भागात तपासणी नाके उभारण्याच्या घटनेने नागरिकांसह कर्नाटक सरकार आणि पोलीस यांच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. सीमावाद होऊन पुढील काळात या भागात तणावपूर्ण आणि संवेदनशील स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी या भागात महसुली हद्दीत असे प्रकार करण्यास कर्नाटक पोलिसांना कायदेशीररित्या रोखावे. तसेच सामाजिक सलोखा राखावा, अशी मागणी आमदार चौगुले यांनी केली आहे.