वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत कंबर कसली आहे. नियमित गुन्हे घडणाऱ्या भागात पोलिसांनी क्यूआर कोड लावले आहेत. या क्यूआर कोडमुळे चार्ली आणि बिट मार्शल यांना नेमून दिलेल्या ठिकाणी प्रत्यक्षपणे जाऊन पंचिंग करावी लागणार आहे.
शहरात पेट्रोलिंगसाठी चार्ली आणि बिट मार्शल आहेत
नागपुरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नवी योजना आखली आहे. ज्या भागात जास्त प्रमाणात गुन्हे घडतात त्या भागात पोलिसांचा वावर वाढविण्याचा नागपूर पोलीस दलाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. नागपूर शहरात पेट्रोलिंगसाठी चार्ली आणि बिट मार्शल आहेत. यांच्यावर दिलेल्या परिसरात सतत पेट्रोलिंग करून गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासोबतच गुन्हेगारी संपवीण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेकदा काही भागात पोलीस पोहोचतच नाहीत. याच कारणामुळे अनेक गुन्हे घडतात.
गुन्हा घडूच नये यासाठी पोलिसांनी नवीन योजना आखली आहे. ज्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे, अशी शहरातील 1500 ठिकाणं पोलिसांनी शोधली आहेत. या सर्व ठिकाणांवर नेमून दिलेल्या बिट मार्शल आणि चार्ली पोलिसांना जायचं आहे. तसेच या ठिकाणी जाऊन त्यांना स्कॅनिंग करावं लागणार आहे. स्कॅन करताच नेमून दिलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचला आहे, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार म्हणजे पोलिसाला नेमून दिलेल्या परिसरात जावंच लागणार. परिणामी पोलिसांचा संवेदनशील भागात सतत वावर असेल. ज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसेल. सोबतच पोलिसांच्या कामाचे मूल्यमापनसुद्धा होणार आहे.
शहरात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असते हे खरं आहे. मात्र अनेकदा हे पेट्रोलिंग कागदावरच असते. परिसरात न पोहोचताच चार्ली आणि बिट मार्शल कुठे तरी थांबले असतात. मात्र नव्या यंत्राणेमुळे त्यांना दिलेल्या परिसरात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र याचा किती फायदा होईल ते येणाऱ्या काळातच समजणार आहे. (फोटो क्रेडिट गुगल)