जोपर्यंत कोरोना विषाणूची साथ कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. मात्र, कोरोना साथीमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे.
मागील वर्षापासून कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. नियोजित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार होते. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भौतिक शास्त्रज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक जयंत नारळीकर हे आहेत. मात्र, कोरोनामुळे साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. त्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट सरल्यामुळे संमेलन आयोजित करण्याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याबाबत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अधिक माहिती दिलीय.
“नाशिक साहित्य संमेलन स्वागत मंडळ आणि साहित्य मंडळ सदस्य चर्चा करण्यासाठी आले आहेत. संमेलन व्हायला पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. लोकांचा मान राखून साहित्य संमेलन झाले पाहिजे. मात्र, जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. तसेच सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत संमेलन आयोजित करता येणार नाही. जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन होणार नाही,” असे ठाले पाटील म्हणाले.
तसेच कोरोनास्थितीमुळे सध्या बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल का ? या प्रश्नावर ठाले यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित केले जाणार नाही, असे सांगितलेय. तसेच ऑनलाईन संमेलन हे संकल्पनेत बसत नाही. लोकांना पुस्तक खरेदी करावे लागतात, असे ठाले यांनी म्हटलंय.
दरम्यान, संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आगामी काळात निर्बंध कमी झाले तर कमी वेळेत पुढची तयारी करू. ऑगस्टनंतर संमेलन आयोजित करण्यावर चर्चा झाली आहे. या संमेलनामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यावर विचार सुरु आहे, असेही यावेळी साहित्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे. (फोटो क्रेडिट गुगल)