नाशिक येथे मोठ्या दणक्यात झालेल्या साहित्य संमेलनानंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होत आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात 22, 23 आणि 24 एप्रिल 2022 रोजी हे संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची निवड झाली आहे, तर स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी एक लेख लिहून नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या निमंत्रकापासून ते आयोजकांपर्यंत साऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. नाशिकचे साहित्य संमेलन एकट्या छगन भुजबळांचे झाले. साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला. नाशिकने संमेलनासाठी निधी उभारण्याचा नवा फॉर्म्युलाच शोधला. एखाद्या मंत्र्याला किंवा वजनदार नेत्याला स्वागताध्यक्षपद बहाल केले की, साहित्य संमेलन कम राजकीय संमेलन झोकात साजरे झालेच म्हणून समजा.
भागातील दहा-वीस आमदार आणि एक दोन खासदारांची पत्रे घ्यायची. त्यांच्या निधीतून दीड-दोन कोटी विनासायास मिळतात, अशी टीकेची झोड ठाले-पाटील यांनी महामंडळाच्या अक्षरयात्रा या नियतकालिकातील अध्यक्षीय मनोगतातून उडवली होती. त्यानंतरही उदगीरच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे.
उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातील ग्रंथदालनासाठी प्रकाशक, ग्रंथवितरकाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती http:abmss95.mumu.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज 31 मार्च 2022 पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी पुस्तक प्रदर्शन समितीचे समन्वयक ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांच्याशी 9090687127, 98904222800 या क्रमांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.