करिअरचे अनेक पर्याय सध्या विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. त्याबद्दलचं मार्गदर्शनही मिळतं. मात्र करिअर घडवणं त्या विद्यार्थ्याच्याच हातात असतं. यूपीएससीसारख्या कठीण परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा कस लागतो. हुशार, मेहनती आणि ध्येय निश्चित असलेल्या विद्यार्थ्यांनाच यात यश मिळण्याची शक्यता अधिक असते. असे विद्यार्थी इतरांसमोर आदर्श ठेवतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी काहीनाकाही संघर्ष करूनच तिथपर्यंत पोहोचलेले असतात. छत्तीसगढमधील आयएएस ऑफिसर नम्रता जैन हिची कहाणीही अशीच संघर्षानं भरलेली पण प्रेरणादायी आहे. नुकतेच यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नम्रता जैन हिचा प्रवास रंजक व आदर्शवत ठरेल.
नक्षली भागातून आयएएस होण्यापर्यंतची कहाणी
छत्तीसगढच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यातून नम्रता जैन हिनं तिचं शिक्षण घेतलं. दंतेवाडातील कारली येथील निर्मल निकेतन स्कूलमधून तिनं शालेय शिक्षण घेतलं. दहावीची बोर्डाची परीक्षा दिल्यावर मात्र तिच्यासमोर पेच उभा ठाकला होता. कारण शिक्षणासाठी घरापासून लांब राहणं घरच्यांना मान्य नव्हतं. मात्र यात तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. घरच्यांची समजूत काढल्यानंतर केपीएस भिलाई स्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा दिल्यावर भिलाई इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून नम्रतानं बीटेक केलं.
उत्तम करिअर घडवायचं असेल, तर त्याची सुरुवात बालवयातच करावी लागते. नम्रतानंही शालेय वयातच आयएएस होण्याची स्वप्न पाहिले. आठवीत असताना शाळेच्या एका कार्यक्रमात भाषण देण्यासाठी कलेक्टर आले होते. तिच्या वडिलांनी आयएएस ऑफिसर म्हणजे कोण, त्यांचे अधिकार काय असतात, याविषयी तिला सांगितलं होतं. तेव्हाच तिच्या मनावर या क्षेत्राचा प्रभाव पडला. तिनं यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली खरी, पण त्याच दरम्यान 6 महिन्यांच्या अंतरानं तिच्या दोन काकांचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाला. या धक्क्यांमुळे ती मानसिकदृष्ट्या थोडी खचली, पण काकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुप्पट मेहनतीनं तिनं तयारी सुरू केली.
नम्रतानं 2015मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र पहिला प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर पुढच्याच वर्षी 2016 मध्ये तिनं पुन्हा परीक्षा दिली. यात 99वी रॅंक मिळवून मध्य प्रदेश केडरमधून ती आयपीएस ऑफिसर झाली. आयएएस होण्याच्या आपल्या ध्येयापासून तिनं माघार घेतली नाही. तिनं तयारी सुरुच ठेवली. पुन्हा 2018मध्ये 12वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी ती आयएएस ऑफिसर बनली. त्यानंतर दोन वर्षांनी 16 सप्टेंबर 2020 मध्ये तिनं आयपीएस ऑफिसर निखिल राखेचा याच्याशी लग्न केलं. छत्तीसगढमधील महासमुंद जिल्ह्यात तेव्हा त्याची नेमणूक झाली होती. 2019 मध्ये ट्रेनिंगदरम्यान त्यांची ओळख झाली व तिथेच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या लग्नासाठी जिल्ह्यातील अनेक ऑफिसर्स उपस्थित होते.
नक्षलींचा अड्डा, दंतेवाडा
छत्तीसगढमधील दंतेवाडा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. इथे साक्षरतेचा दर तर कमी आहेच, शिवाय बेरोजगारी, घरगुती वादाची प्रकरणं यांचं प्रमाणही अधिक आहे. ज्या भागात नम्रता जैन हिचं घर होतं, त्या भागात केवळ 2G इंटरनेट चालत होतं. इतक्या अडचणींमधूनही मार्ग काढण्याची ताकद जिद्द आणि मेहनतीमुळेच मिळते. आयएएस ऑफिसर नम्रता जैन हिच्या प्रवासामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.