आर्थिक आघाडीवर अपयश आल्याने राजीनामा
आर्थिक आघाडीवरील अपयशामुळे टीकेच्या धनी ठरलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अखेर राजीनामा दिला. हुजूर पक्षातील वाढत्या नाराजीमुळे त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अवघ्या ४५ दिवसांतच त्यांना पायउतार व्हावे लागले असून ही ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात छोटी कारकीर्द ठरली आहे.
ट्रस यांनी सत्तेत येताच केलेल्या करकपातीच्या घोषणेनंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था हादरली होती. त्यामुळे त्यांना आधी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी करावी लागली. नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी ट्रस यांचे सर्व निर्णय केराच्या टोपलीत टाकले. तेव्हाच ट्रस यांची कारकीर्द अल्पजीवी ठरणार, हे स्पष्ट झाले होते. त्यातच बुधवारी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही ट्रस यांच्यावर टीका करत राजीनामा दिला.
गुरुवारी हुजूर पक्षातील सर्वात ज्येष्ठ पार्लमेंट सदस्य सर ग्रॅहम ब्रँडी यांनी अचानक त्यांची भेट घेतली. ब्रँड हे पक्षाच्या ‘१९२२ बॅकबेंचर्स कमिटी’चे अध्यक्षही आहेत. या भेटीत नेमके काय झाले, हे बाहेर आले नसले तरी त्यांनी ट्रस यांना स्वत:हून राजीनामा देण्याचा अखेरचा इशारा दिला असावा, असे मानले जात आहे. त्यानंतर १० डाऊिनग स्ट्रीट या पंतप्रधान निवासस्थानाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रस यांनी पंतप्रधान आणि पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.येत्या आठवडाभरात पुन्हा पक्षांतर्गत निवडणूक होऊन नवा नेता निवडला जाईल. तोपर्यंत आपण हंगामी पंतप्रधानपदी राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.