काँग्रेस नेते राहुल गांधी हे 7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले. राहुल गांधींच्या यात्रेचा महाराष्ट्रातला मुक्काम 14 दिवस होता, पण आता हा मुक्काम वाढणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला समारोप जळगाव जामोदमध्ये होणार होता, मात्र आता भारत जोडो यात्रेचा मुक्काम 2 दिवस वाढला आहे.
गुजरात निवडणुकांच्या प्रचाराला राहुल गांधी 2 दिवस जात आहेत, त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्येच राहील. 23 तारखेला राहुल गांधी गुजरात चा प्रचार दौरा आटोपून पुन्हा भारत जोडो यात्रा ला सुरवात करतील तोपर्यंत भारत जोडो यात्रा 2 दिवस महाराष्ट्र मधेच राहणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.
दरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या भारत जोडो यात्रेबाबत ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘ शिवाजी महाराजांचं साहस, बाबासाहेबांचं संविधान, महात्मा फुले यांची शिक्षा आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांच्या प्रेमाची प्रेरणा घेऊन पुढे जात आहे. हा सत्कार आणि अभूतपूर्व अनुभवासाठी महाराष्ट्राच्या लोकांचे धन्यवाद. जय शिवाजी, जय महाराष्ट्र,’ असं कॅप्शन राहुल गांधी यांनी या व्हिडिओला दिलं आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे या यात्रेचा महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा आता सुरू होणार आहे, असं बोललं जात आहे. भाजपचा प्रभुत्व असलेल्या उत्तरेच्या राज्यांमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.