ऊस दराच्या एफआरपी संदर्भात काढलेल्या आदेशावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानी पाठोपाठ रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत देखील आक्रमक झाले आहेत. एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येणार असल्यानं शेतकरी उपाशी आणि कारखानदार तुपाशी, अशी स्थिती निर्माण होणार असून त्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदाभाऊ खोत यांनी 26 फेब्रुवारीपासून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारनं एफआरपीच्या नियमांमध्ये बदल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. महाविकास आघाडीचं हे सरकार शेतकरीद्रोही असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत शिर्डीतून या आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. शुगर केन कंट्रोल अॅक्ट 1966 नुसार शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली FRP ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत एकरकमी मिळाली पाहिजे हा कायदा होता, पण या कायद्याची पायमल्ली करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. ही FRP आता दोन टप्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र, खानदेशासाठी 10% रिकवरीचा आहे. दुसरा कप्पा मराठवाडा विदर्भसाठी 9.5% रिकव्हरी चा आहे.
याच्यातुन तोडणी वाहतूक वजा करायची आहे. दुसरा हप्ता साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांनी द्यायचा आहे आणि कारखान्याने केलेले जे खर्च आहेत, ते सर्व खर्च वजा करून राहिलेले पैसे शेतकऱ्याला द्यायचे आहेत. याचा अर्थ सरळ आहे कि, “साखर कारखानदार तुपाशी अन् माझा शेतकरी उपाशी” अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर शेतकऱ्यांना मातीत घालणारं आहे. असं हे शेतकरीद्रोही सरकार या राज्यांमध्ये काम करत आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये येत्या 26 फेब्रुवारीला शिर्डी जिल्हा अहमदनगर येथून रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चा अशी संयुक्तरित्या आंदोलनाची घोषणा करत आहे. या सरकारच्या विरोधामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.