प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किमंत मिळावी या उद्देशाने देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हमीभाव केंद्र ही सुरु केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान होत नाही. अन्यथा खुल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागते. 2021-22 मधील खरीप हंगामात या माध्यमातून सरकारने 696 लाख मेट्रीक टन धान्याची खरेदी केली आहे. यामध्ये पंजाब राज्यात 1कोटी 86 लाख मेट्रीक टनाची खरेदी करण्यात आली असून हेच राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे 94.15 लाख शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमतीवर धानाची विक्री सरकारला केली आहे. त्यांच्या पिकाच्या मोबदल्यात 1 लाख 36 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. अनेक राज्यांमध्ये या हमीभावाने धान्याची खरेदी ही सुरु आहे.
छत्तीसगडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी घेतला लाभ
एमएसपीवर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक छत्तीसगडमध्ये आहे. येथे 21,05,972 शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तर पंजाबच्या 9,24,299 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. चंदीगड, गुजरात, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये धानाची खरेदी करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
भारतीय अन्न महामंडळाने आपल्या डेली बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, भात खरेदीच्या बाबतीत छत्तीसगडचा दुसरा क्रमांक आहे. येथील शेतकऱ्यांनी एमएसपीवर 92.01 लाख मेट्रिक टन धानाची विक्री केली आहे. तेलंगणा याबाबतीत 70.22 लाख मेट्रिक टनासह तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात 63. 55 लाख मेट्रिक टन, हरियाणात 55.31 लाख , ओडिशात 47.7 लाख मध्य प्रदेशात 45.83 लाख आणि बिहारमध्ये 39.36 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली आहे.
देशभरातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 1,36,351 कोटी रुपये भाताच्या एमएसपीपोटी मिळाले आहेत. त्यामध्ये पंजाब राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 36 हजार 623 कोटी 64 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना 18 हजार 33 कोटी 96 लाख रुपये, हरयाणातील शेतकऱ्यांना 10 हजार कोटी 97 लाख, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना 12 हजार 553 कोटी 12553.55 कोटी, तेलंगणातील शेतकऱ्यांना 13 हजार 763 कोटी, आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना 6 हजार 760 कोटी आणि बिहारच्या शेतकऱ्यांना 8 हजार 330 कोटी रुपये मिळाले आहेत. मध्य प्रदेशला 8 हजार 981 कोटी रुपये आणि ओडिशाला 9 हजार 677कोटी रुपये मिळाले आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा धान खरेदी घटली
महाराष्ट्रात चालू हंगामात आतापर्यंत एकूण 2 हजार 606 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी झाली आहे. 13,29,901 टन धानाच्या बदल्यात शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत. 2019-20 मध्ये येथील शेतकऱ्यांनी 3 हजार 164 कोटी रुपयांचे धान विकले तर 2020-21 मध्ये शेतकऱ्यांनी 3 हजार 547 कोटी रुपयांचे धान विकले. मात्र, खरेदीचा हंगाम संपण्यास अद्याप वेळ शिल्लक आहे. त्यामुळे यंदा काय होते हे पहावे लागणार आहे.