करोना संशोधन गटाच्या
प्रमुखांचा राजीनामा
साथरोगतज्ज्ञ शाहिद जामील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन राजीनामा दिलाय. भारतामधील करोना विषाणूंच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही वैज्ञानिकांचा समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. जामील हे या गटाचे प्रमुख होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारस त्यांनी हे पद सोडत असल्याचं जाहीर केलं. जामील यांनी अशाप्रकार तडकाफडकी राजीनामा देणं हा सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
‘तौत्के’ चक्रीवादळाचा
परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर
कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तौत्के चक्रीवादळ संथगतीने गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकू लागलं आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून १२० किमी अंतरावर समुद्रात असून, याचा प्रचंड फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गनंतर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये वादळाच्या तडाख्यात सापडणाऱ्या भागांतून तब्बल एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.
चक्रीवादळात दोन जहाज भरकटले,
300 जण अडकल्याची भीती
तौत्के चक्रीवादळाचा तडाखा मुंबई किनारपट्टीला बसला असून समुद्रामध्ये दोन मोठी जहाजं भरकटल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलीय. यापैकी एका जहाजावर २७३ जण तर दुसऱ्यावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्याची माहिती नौदलाने दिलीय. एकूण ४१० जणांचे प्राण वाचवण्यासाठी मुंबईच्या समुद्रात ही नौदलाची जहाजं शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
२३ मे रोजी NEFT
सेवा बंद असणार
देशात सध्या मोठ्या प्रमाण डिजिटल बँकिंग पर्याय उपलब्ध आहे. सहज सोप्या पद्धतीने डिजिटल माध्यमांतून देवाणघेवाण केली जाते. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे. या दरम्यानं डिजिटल व्यवहारासंदर्भात आरबीआयने एक सूचना जारी केली आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काही अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
..तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,” शिवसेना आमदाराचा सरकारला इशारा
उजनी धरणातील पाण्यावरुन सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील वाद येत्या काही दिवसांत पेटण्याची चिन्हं आहेत. उजनी धरणातील पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी इंदापूरला देण्यावरून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सध्या वाद रंगला आहे. सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी त्यांनीदेखील विरोध दर्शवत तर रक्तरंजित लढाईला तयार रहावे असा इशारा ठाकरे सरकारला दिला.
घाऊक बाजारातील महागाई
दर १०.४९ टक्क्यांवर
घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक किंमतीची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर डोकेदुखी वाढवणारा आहे. डाळी, फळं आणि अंडी-मांस यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तर गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमतीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. मार्च महिन्यात महागाई दर हा ७.३९ टक्के इतका होता. तर एप्रिलमध्ये हा महागाई दर १०.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास ३.१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा
डोस ८४ दिवसांनी मिळणार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिन डिजिटल पोर्टलवर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ८४ दिवसांनी मिळणार आहे. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांआधीच ज्यांना नोंदणी केली होती त्यांना लसीकरण केंद्रावरून परत पाठवण्यात येत आहे. कोव्हिन पोर्टलवर ज्यांनी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी नोंदणी केली आहे ती नोदंणी दुसऱ्या डोससाठी सुद्धा ग्राह्य ठरणार आहे.
गोमूत्र पीत असल्याने करोना
झाला नाही : खासदार प्रज्ञा सिंह
नेहमीच आपल्या विधानांवरून चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कोविडमुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. गोमूत्र प्यायल्याने करोनासुद्धा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचे उदाहरण देत आपण रोज गोमूत्र पीत असल्याने करोना झाला नसल्याचे सांगितले. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
गेल्या दहा दिवसांत
चार वाघांचा मृत्यू
मध्य प्रदेशात रेडिओ कॉलर लावण्यात आलेल्या एका वाघिणीचा पन्ना अभयारण्यात मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा दिवसांत विविध अभयारण्यात चार वाघांचा मृत्यू झाला आहे.
बंगालमध्ये सीबीआयच्या कार्यालयावर
तृणमूल कार्यकर्त्यांचा हल्ला
सीबीआयने छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली. नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक कऱण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहेत. त्यांनी दगडफेकही करण्यास सुरुवात केली आहे.
मेक्सिकोची अँड्रिया मेझा
मिस युनिव्हर्स 2020 ठरली
मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्स 2020 ठरली आहे. तिला माजी मिस युनिव्हर्स जोजिबिनी टूंजीनं क्राऊन घातला. फ्लोरिडामध्ये हा कार्यक्रम पार पडला. ब्राझीलची ज्युलिया गामा फर्स्ट रनरअप ठरली. भारताची अॅडलिन कॅस्टेलिनो थर्ड रनरअप ठरली.
अँड्रिया मेझा सॉफ्टवेअर अभियंता असून मिस युनिव्हर्स ठरणारी ती तिसरी मेक्सिकन महिला ठरली आहे.
गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी
पुण्यात 125 बाईक्सची रॅली
माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी पुण्यात 125 बाईक्सची रॅली काढण्यात आली होती. यावेळी कोरोना संबंधी नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाईक रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या 15 पथकांकडून आरोपीची धरपकड सुरु आहे. माधव वाघाटे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील सराईत गुन्हेगार होता.
अभिनेत्री दिया मिर्झा
लवकरच आई होणार
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. तिने काही काळापूर्वी व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केले आहे. दिया मिर्झा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि आपल्या चाहत्यांना बर्याच विषयांवर माहिती देत असते. दियाने नुकतेच ट्विट केले आहे की, सध्या कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी वापरली जाणाऱ्या लसीची अद्याप गर्भवती महिलांसाठी क्लिनिकल चाचणी घेतली गेली नाहीय.
टीम इंडियाच्या श्रीलंका
दौऱ्यावर कोरोनाचे सावट
टीम इंडिया जुलै महिन्यात विराट कोहली आणि अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर भारताच्या युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व युवा खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच हे खेळाडू या दौऱ्यासाठी उत्सुक आहेत. मात्र या दौऱ्यावर कोरोनाचे सावट आहे. श्रीलंकेत गेल्या 2 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
SD social media
9850 60 3590