प्रयागराजमधील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, पोलिस तपासा दरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतंय. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गीरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांना या प्रकाराची माहिती संध्याकाळी सव्वा पाच वाजता मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह त्यांच्या मठातील खोलीत मिळून आला. मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत होता आणि खोलीचे सर्व दरवाजे बंद होते. खोलीचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. त्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रयागराज पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की घटनास्थळावर जवळपास 7 पानी चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी आणि अन्य शिष्यांचं नाव लिहिलं आहे. तसंच ते अनेक कारणांमुळे मानसिक तणावातून जात होते. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.
महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये आश्रमबाबत काय करायचं याबाबतही लिहिलं आहे. तसंच कुणाची काळजी घ्यायची. कुणाला काय द्यायचं आहे, याबाबतही त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलाय. आपल्या शिष्यांमुळे दु:खी असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.
‘आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री नरेंद्र गिरी यांचा मृत्यू अत्यंत दु:खद आहे. अध्यात्मिक परंपरांप्रति समर्पित भावनेतून त्यांनी संत समाजातील अनेक धारा एकत्र जोडण्यात मोठी भूमिका बजावली आहे. देव त्यांना आपल्या चणी स्थान देवो’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.