प्रशांत किशोर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीला

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. मुंबईत पवारांशी तब्बल साडेतीन तास चर्चा केल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा पवारांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही तरी शिजत असून पवारांच्या मनात काय सुरू आहे? असा प्रश्न या निमित्ताने केला जात आहे.

ऑपरेशन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बऱ्याच महिन्यानंतर काल दिल्लीत दाखल झाले. पवार दिल्लीत तीनचार दिवस राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह केरळातील काही नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रशांत किशोर पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी भेटीला दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ही भेट किती वाजेपर्यंत चालेल? या भेटीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल? दिल्लीतच ही भेट का होत आहे? ही भेट पूर्वनियोजित होती का? यावेळी आणखी कोण उपस्थित राहणार आहे? काँग्रेसमधून कोणी यावेळी उपस्थित असेल का? आदी प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत साडे तीन तास चर्चा झाली होती. या भेटीत देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. राष्ट्रवादीची पुनर्बांधणीवरही त्यात चर्चा झाली होती, असं सूत्रांनी सांगितलं. भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 जागांवर मात देता येऊ शकत असल्याचं किशोर यांनी त्या भेटीत दाखवून दिलं होतं. त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली होती. तसेच एकट्याच्या बळावर काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी या बैठकीत पवारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. देशपातळीवर भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल तसे न घडल्यास राज्य पातळीवर विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असावा याची माहितीही त्यांनी पवारांना दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. किशोर यांचे हे मुद्दे पटल्यानेच पवारांनी प्रशांत किशोर यांना पुन्हा भेटीची वेळ दिल्याचंही सांगण्यात येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.