राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बीत गेलेली पिकं, कोरोनामुळे पडलेले शेतमालाचे भाव आणि झालेल्या नुकसानीचं ओझं घेऊन यंदा शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली खरी… पण पावसानं पुन्हा दगा दिला. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. पेरलेलं बी बियाणं गेलं, खतं वाया गेली… या संकटात पान्हावलेल्या डोळ्यांनी शेतकरी सरकारकडे आस लावून बसला आहे.
राज्यात मान्सून दाखल झाला. सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आणि बळीराजा पेरणीच्या कामाला लागला. कुणी उसनवारी करुन, तर कुणी कर्ज काढून तर काहींनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून बियाणं आणलं आणि पेरणीचं सौंग साजरं केले. पण पाऊस गायब झाला आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यातील कोकण, औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती सर्वच महसूल विभागात कुठे ना कुठे दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.
राज्यात आतापर्यंत सरासरी 40 टक्क्यांच्या जवळपास खरीप लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 56 टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे, त्यापाठोपाठ 47 टक्क्यांच्या वर कापसाची लागवड झाली आहे. पण बऱ्याच भागात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही जिल्ह्यात आणि बऱ्याच तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे.
राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता राज्यातील 35 तालुक्यात जून महिन्यात सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यातील नंदुरबार, नाशिक, धुळे, गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.