आज दि.२७ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

“पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल तेव्हाच…”, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचं मोठं विधान!

गेल्या कित्येक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. १९९४ साली भारतीय संसदेनं पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून परत घेण्यासंदर्भात ठरावही पारित केला होता. मात्र, अद्याप त्यामध्ये यश आलेलं नाही. यासंदर्भात काश्मीरमध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. “पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल तो दिवस फार दूर नाही”, असं ते म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांच्या या विधानावर चर्चा सुरू झाली आहे. १९४७ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं यशस्वीरीत्या प्रवेश केल्याच्या निमित्ताने दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘शौर्य दिवस’ निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराचं कौतुक करतानाच पाकव्याप्त काश्मीर आणि इतर मुद्द्यांवरही भूमिका मांडली.

CNG आणि PNG चे दर कमी होणार? सरकार लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत

दिवाळीनंतर वाढलेल्या महागाईतून ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि पीएनजीमध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती CNBC ने दिली आहे.

गॅसवर आधारित खत ऊर्जा प्रकल्प आणि सीएनजी पीएनजी ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ग्राहकांसाठी योग्य किंमत ठरवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतं. याबाबत किरीट पारीख समितीचा अहवाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल अशी अपेक्षा आहे.

जगभरात मंदीचं सावट, Facebook ला मोठा दणका

जगावर मंदीचं सावट आहे. कधी काय होईल याचा नेम नाही अशी परिस्थिती असताना आता फेसबुकला मोठा दणका बसला आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या उत्पन्नात सलग दुसऱ्या तिमाहित घट झाल्याची माहिती समोर आली आहे. जाहिरातींच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे. या तिमाहीचे निकाल वाईट असल्याचं समोर आलं. दरवर्षी 10 अब्ज डॉलर खर्च करण्याच्या योजनेबाबत प्रश्नचिन्ह समोर आहे. कंपनीचा आलेख सातत्याने खाली येत आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्सही चांगलेच आपटले आहेत. मेटाच्या शेअरमध्येही लक्षणीय घसरण झाली आहे. मोठ्या प्रमाणावरील जाहिरातींवरील खर्च कमी झाल्यामुळे मेटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा फटका बसला आहे.

राम कदम तर ‘विद्वान’, फडणवीसांचही अवघड आहे….; चलनी नोटांवरुन सुषमा अंधारेंची टीका

भारतीय चलनी नोटांवर फोटो छापण्यावरुन चांगले राजकारण तापले आहे. यावरून आज शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आमदार राम कदम यांना अंधभक्त म्हणून टोला लगावला आहे. आमदार राम कदम हे विद्वान आहेत. नशीब त्यांनी चलनी नोटांवर फडणवीस यांचा फोटो छापवा असे म्हणाले नाहीत. यावरून अंध भक्ती किती आहे हे समजते. हा सगळा हल्याचे दूध काढण्याचा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

तर आमदार बच्चु कडू आणि आमदार राणा यांच्यातील वाद फडणवीस यांनी मिटवावा. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी फुग्याला टाचणी लागायची वेळ आली आहे. त्यामुळे जे खोके आहेत ते दोघात बसून वाटावे, असा सल्ला अंधारे यांनी दिला.

“मनसे सरड्यांपेक्षा जास्त रंग बदलणारा पक्ष”, शिवसेनेची खोचक शब्दांत टीका

मशिदीवरील ‘भोंगे’ हटवा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाष्य केलं होतं. तर, औरंगाबादमध्ये ४ मे ला झालेल्या सभेत मशिदीवर ‘भोंगे’ हटवावे अन्यथा, हनुमान चालीस लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यात आता मनसेने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘भोंगे’ लावले आहेत. यावरून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेला ‘सरड्या’ची उपमा दिली आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मनसेची भूमिका सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. भोंगे वाजवले, पुन्ह बंद केलं, लोकांना किती गृहित धरणार. किती खोटे बोलायचं. त्यांच्या पक्षाचे नाव वेगळं आणि प्रत्यक्षात कृती वेगळी आहे. लोकांच्या मनात आपल्या पक्षाविषयी काय प्रतिमा तयार होते, याचा सुद्धा विचार करावा,” असा सल्लाही पेडणेकर यांनी मनसेला दिला आहे.

साखर कारखान्यांच्या व्यवहारात २५ हजार कोटींचा घोटाळा – ॲड. तळेकरांची माहिती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राज्य सरकार व काही जिल्हा बँकाच्या संगनमताने व पुढाकाराने राज्यभरातील जवळपास ४९ सहकारी साखर कारखाने खासगी मालकीचे करण्यातून २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणात अधिक तपासाच्या परवानगीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने सत्र न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश तळेकर यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली. २००७ ते २०११  दरम्यानच्या या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त ( विशेष कृती दल) श्रीकांत परोपकारी यांनी शरद पवार यांना ५ मार्च २०२० रोजी निर्दोषत्व बहाल करणारे पत्र दिले आहे. तर सुरुवातीला या प्रकरणात सी समरी अहवाल दिल्यानंतर पुन्हा तपासासाठी मागितलेली परवानगी ही अलिकडे झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतरची महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित देश, गॅलपच्या सर्वेक्षणात समोर

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली आहे. या यादीत भारतापेक्षाही पाकिस्तान सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. गॅलप या संस्थेने हे सर्वेक्षण केलं आहे. जगभरातील १२१ देशांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये ६० व्या क्रमांकावर राहत १०० पैकी भारताला ८० गुण मिळाले आहेत. तर, पाकिस्तानला ८२ गुण मिळाले आहेत.कायदा आणि सुवस्थेचं सर्वेक्षण करणाऱ्या गॅलप संस्थेने जगभरातील १२१ देशांतील लोकांशी चर्चा केली. त्यामध्ये तेथील लोकांना परिसरातील पोलिसांवर विश्वास आहे का? रात्री एकटे फिरणे सुरक्षित वाटतं का? गेल्या १२ महिन्यात तुमच्याकडे चोरी झाली का? अथवा तुमच्यावर प्राणघातक हल्ला झाला का? असे प्रश्न विचारले आहेत.

इन्स्टाग्रामने पार केला २ अब्ज सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा

मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनच्या इन्स्टाग्रामने आता दोन अब्ज सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला असून ही वाटचाल अशीच सुरू राहिली तर फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्यादेखील इन्स्टाग्राम सहज पार होईल, असे चित्र आहे. गेल्या काही वर्षांत फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या घटली असून सक्रिय वापरकर्तेही फारसे वाढलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामची वाटचाल लक्षणीय ठरते आहे. फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या सध्या २.९६ अब्ज एवढी आहे.

‘बिग बॉस’च्या घरात येणार नवा ट्विस्ट, होणार कतरिना कैफची एंट्री

सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. या घरात रोजच काही ना काही घडामोडी घडत असतात आणि आठवड्याच्या शेवटी सलमान खान या घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो. परंतु हा सिझन सुरु झाल्यावर काही दिवसातच सलमानला डेंग्यू झाला. त्यामुळे त्याच्या जागी ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनाची धुरा करण जोहरने सांभाळली. पण आता लवकरच या कार्यक्रमात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफची ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री होणार आहे.

एकमेव अद्वितीय! जे T20 मध्ये कोणाला आतापर्यंत चारदाही जमलं नाही ते सूर्यकुमार यादवनं आज पाचव्यांदा करुन दाखवलं

टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील सामना आज भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला गेला. सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्स ९ बाद १२३ धावाच करु शकला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके केली. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने अर्धशतकाबरोबरच एक विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.सूर्यकुमार यादवने २५ चेंडूचा सामना करताना ५१ धावा केल्या ज्यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. ज्यामुळे तो एकाच वर्षात दोनशेपेक्षा अधिक स्ट्राइक-रेटने पाचवेळा पन्नास किंवा त्यापेक्षा धावा नोंदवणारा सूर्यकुमार यादव हा टी-२० आंतरराष्ट्रीयक्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे.

सुपर-१२ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा टीम इंडिया एकमेव संघ

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून स्पर्धेतील विजयी मालिका कायम ठेवली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात नेदरलँड्सचा ५६ धावांनी पराभव केला.

नेदरलँड्वरील विजयासह, भारत चालू स्पर्धेच्या सुपर-१२ टप्प्यात सलग दोन सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. गट १ मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका, तर गट २ मध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.