युवा आघाडीपटू मनीषा कल्याण ‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये सहभाग नोंदवणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू ठरली आहे. ती सायप्रसच्या इंगोमी येथे युरोपियन क्लब स्पर्धेत अपोलोन लेडीज एफसीकडून खेळली.
मनीषाने मारिलेना जॉर्जिओयूच्या जागी ६०व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरताच हा विक्रम आपल्या नावे केला. ‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीगच्या सलामीच्या लढतीत अपोलोन संघाने लॅट्वियातील आघाडीचा क्लब एसएफके रिगाला ३-० असे पराभूत केले.
मनीषाने राष्ट्रीय संघासह भारतीय महिला लीगमध्ये गोकुलम केरळ संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. तिला २०२१-२२ वर्षांसाठी ‘एआयएफएफ’ सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ब्राझील संघाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यात मनीषाने गोल झळकावत सर्वाचे लक्ष वेधले होते. विदेशी क्लबकडून कराराबद्ध करण्यात आलेली मनीषा ही दुसरी भारतीय खेळाडू आहे. याआधी डांगमेइ ग्रेसला उझबेकिस्तानच्या एफसी नसाफने करारबद्ध केले होते.