टिपू सुलतानवरील पुस्तकाच्या विक्री, वितरणाला स्थगिती

टिपू सुलतानावरील एका पुस्तकाच्या वितरण आणि विक्रीला बंगळूरुतील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पुस्तकात म्हैसूरचा राजा असलेल्या टिपू सुलतानाबद्दल चुकीची माहिती छापली असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात मंगळवारी याबाबत सुनावणी झाली. ‘टिपू निजा कनसुगालू’ (टिपूचे खरे स्वप्न) या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक असलेल्या अयोध्या पब्लिकेशन आणि मुद्रक असलेल्या राष्ट्रोत्थान मुद्रणालय यांना हे पुस्तक विकण्यास आणि त्याचे वितरण करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत तात्पुरता मनाई आदेश जारी केला आहे. कन्नड भाषेतील हे पुस्तक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे न्यायालयाच्या आदेशात म्हटल आहे. या पुस्तकाची छपाई करण्यास आणि छापलेली पुस्तके संग्रहित करण्यास मात्र कोणतही मनाई करण्यात आलेली नाही.

जिल्हा वक्फ बोर्ड समितीचे माजी अध्यक्ष बी. एस. रफिउल्ला यांनी या पुस्तकाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. हे पुस्तक टिपूबद्दल चुकीची माहिती देत असून या पुस्तकाला कोणताही ऐतिहासिक आधार व पुरावा नसल्याचा दावा रफिउल्ला यांनी केला. या पुस्तकात वापरलेला ‘तुरुकारू’ हा शब्द मुस्लीम समाजाचा अवमान करणारा आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे अशांतता आणि जातीय तेढ निर्माण होईल, तसेच सार्वजनिक शांततेचा मोठय़ा प्रमाणात भंग होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने तिन्ही प्रतिवादींना तातडीच्या नोटीस बजावल्या आणि प्रकरणाची सुनावणी ३ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.