बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. आपल्या अभिनय कौशल्याने त्याने देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच त्यांनी ‘कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त पत्नी जया बच्चन यांच्याबरोबर हजेरी लावली. या महोत्सवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली.
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरवात झाली. सुरवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात अमिताभ बच्चन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा अशी मागणी केली. त्या असं म्हणाल्या की, “अधिकृरित्या नसले तरी आम्ही बंगालमधून अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ दिलेल्या योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी करणार आहोत.” ANI ने ट्वीट करत ही माहिती दिली. या महोत्सवात शाहरुख खान, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अर्जित सिंग, जया बच्चन, अमिताभ बच्चन आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. सध्या सगळीकडेच वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांची क्रेझ आहे. सध्या बरेच सेलिब्रिटीज अशा वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत. या चित्रपट महोत्सवाची सांगता २२ डिसेंबर रोजी होणार आहे.