शपथ झाली पण खातेवाटपाला ब्रेक, मंत्र्यांनी मागितले तीन ऑप्शन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारानंतर अजूनपर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. या खातेवाटपाला आता उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सगळ्या मंत्र्यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत आमदारांनी दोन-तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खात्यांशिवाय प्रत्येक मंत्र्याकडून दोन ते तीन बंगल्याचे ऑप्शनची मागणी करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

मंत्र्यांनी दोन-तीन खाती आणि बंगल्याचे ऑप्शन मागितल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेणार आहेत. खातेवाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस प्रयत्न करणार आहेत. राज्याचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाआधी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल, अन्यथा विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जाईल.

कुणी घेतली शपथ?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता राज्यात 20 मंत्री आहेत. मंगळवारी भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे यांनी शपथ घेतली, तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.