दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना सात विकेटने जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला, त्याचा कर्णधार डीन एल्गर. त्याने नाबाद (96) धावांची खेळी केली. आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये भारतीय गोलंदाज प्रभावी ठरले होते. पण चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपली कामगिरी उंचावली व भारतीय गोलंदाजांना अजितबात दाद दिली नाही.
बऱ्याच प्रयत्नांनी रेसी वान डर डुसें (40) मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. पण त्या व्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांना यश मिळालं नाही. वाँडर्स मैदानाचा अलीकडच्या काही वर्षातील इतिहास भारताच्या बाजूने आहे, आज जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे भारतीय गोलंदाज प्रभावी ठरतील, वैगेर या अखेर चर्चाच ठरल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना कुठलीही दाद दिली नाही व शानदार विजयाची नोंद केली.
चौथ्यादिवशी भारतीय गोलंदाजांनी खूप खराब गोलंदाजी केली. बुमराह, सिराज, शमीन बाऊन्सर टाकण्याच्या नादात तीन चौकार दिले. भारतीय गोलंदाजांनी 16 वाईड चेंडू टाकले. बुमराहने गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर 70 धावा दिल्या. सिराज पूर्णपणे फिट नव्हता. ज्याचा फटका संघाला बसला.
जोहान्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर पावसामुळे पहिल्या दोन सत्रांचा खेळ वाया गेला. कर्णधार डीन एल्गर आणि रेसी वान डर डुसेंची जोडी मैदानावर होती. दोन-तीन तासाचा खेळ पावसामुळे वाया गेला. पावसामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल, असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात असं घडताना दिसलं नाही. डुसे आणि एल्गरची जोडी सहजतेने फलंदाजी करत होती. एकेरी-दुहेरी धावा पळण्याबरोबर दोघांनी चौकारही मारले. रेसी वान डर डुसें अत्यंत सहजतेने खेळला. त्याने ठाकूर आणि शामीच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केले. जोहान्सबर्गची कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकल्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता केपटाऊन कसोटीत मालिकेचा निकाल लागेल.