शिंदे-ठाकरे वादाला नवी तारीख, सुप्रीम कोर्टाची सुनावणी 10 दिवसांनी लांबली!

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचं सांगण्यात येत होतं, पण शिंदे आणि फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची? महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार कायदेशीर का बेकायदेशीर? 16 आमदारांच्यावर अपात्रतेच्या टांगत्या तलवारीचं काय? सत्तास्थापनेत राज्यपालांची भूमिका योग्य का अयोग्य? निवडणूक आयोगासमोर सुरू असलेला शिवसेनेचा वाद, या सगळ्या मुद्द्यांवर होणारी सुनावणी 10 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तानाट्याची ही सुनावणी आधी 8 ऑगस्टला होणार होती, यानंतर ही सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली, पण आता या प्रकरणाची सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडली आहे.

भारताचे मुख्य न्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. त्यातच रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत, त्यानंतर उदय लळीत हे देशाचे नवे सरन्यायाधीश होतील. महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा हा पेच रमण्णा यांच्या खंडपीठापुढे संपणार का लळीत यांच्याकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या या सत्तासंघर्षात घटनात्मक पेच असल्याचं न्यायाधीशांना वाटलं तर ही सुनावणी घटनापीठाकडेदेखील पाठवली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.