चीन आणि जगामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान आता भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितलं की, देशातील कोविड-19 चा पॉझिटिव्हिटी दर हा प्रत्येक आठवड्याला कमी होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं की, 22 डिसेंबरला कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर 0.14% होता. मंत्रालयाने म्हटलं आहे की 8 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाची अॕक्टिव्ह प्रकरणं शून्य आहेत.
सरकारच्या म्हणण्यानुसार, 7 ते 13 ऑक्टोबरपर्यंत सरासरी प्रकरणं 2408 म्हणजेच 1.05 टक्के होती. जी नंतर कमी होऊन 153 म्हणजे 0.14 टक्क्यांवर आली. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगात भारतातील कोरोना रुग्णांची सरासरी 0.03 टक्के आहे. जपानमधील 1 लाख 54 हजार 521 म्हणजेच 26.8 टक्के प्रकरणांच्या तुलनेत भारताची स्थिती खूपच चांगली आहे.
तरीही मंत्रालयाने राज्यांना कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. सरकारने राज्यांना आरोग्य सुविधांबाबत मॉक ड्रील घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोविड-19 बाबत आपली तयारी काय आहे, हे कळू शकेल. ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर, मानवी संसाधने तसंच सर्व आवश्यक गोष्टी आहेत का? याची खात्री करण्यास सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेबद्दल सांगितलं. त्यांनी भाजप सरकारच्या प्रयत्नांबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, सोमवारपर्यंत लसीचे 220 कोटी डोस उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही गुरुवारी यासंदर्भात मोठी बैठक झाली. त्यांनी देशातील कोविड-19 ची परिस्थिती आणि खबरदारी यासह अनेक गोष्टींवर चर्चा केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पीएम मोदी म्हणाले की, आगामी काळात अनेक सण आहेत. त्यामुळे कोविड-19 बाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे लागतील. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनीही राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हर्चुअल बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना जारी केल्या.