आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव झाला असून लखनऊ सुपर जायंट्स संघाने ३६ धावांनी या सामन्यावर नाव कोरलं. मुंबई इंडियन्सचा हा सलग आठवा पराभव आहे. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईचा संघ फक्त १३२ धावा करु शकला. लखनऊच्या केएल राहुलने शतकी खेळी केल्यामुळेच लखनऊला विजयापर्यंत मजल मारता आली.
लखनऊने दिलेल्या १६९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीला आलेले इशान किशन आणि रोहित शर्मा मैदानावर सेट होत असतानाच इशान किशन विचित्र पद्धतीने अवघ्या आठ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मादेखील चांगली खेळी करू शकला नाही. ३९ धावा करुन तो कृणाल पांड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी आलेले देवाल्ड ब्रेविस (३), सूर्यकुमार यादव (७) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी आलेल्या तिलक वर्मा आणि किरॉन पोलार्ड या जोडीने मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला.दोघांनीही जोरदार फटकेबाजी करत लखनऊची चिंता काही काळासाठी वाढवली होती.
मात्र तिलक वर्मादेखील मैदानावर जास्त वेळ टिकू शकला नाही. जेसन होल्डरने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिलक वर्मा झेलबाद झाला. त्याने २७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. वर्मा झेलबाद झाल्यानंतर मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. १२ चेंडूमध्ये मुंबईला ४४ धावांची गरज होती. या अशक्य आव्हानाचा पाठलाग करण्याचा मुंबईने प्रयत्न केला मात्र शेवटी त्यांना यश आले नाही.
तिलक वर्मा बाद झाल्यानंतर किरॉन पोलर्डने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र 19 धावांवर तो झेलबाद झाला. त्यानंतर सामना मुंबईच्या हातातून गेला हे स्पष्ट झाल्यानंतर लखनऊ संघ फक्त औपचारिकता म्हणून खेळत होता. शेवटी लखनऊचा ३६ धावांनी दणदणीत विजय झाला.
यापूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे फलंदाज सुरवातीला फलंदाजीसाठी आले. लखनऊची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीला आलेला क्विंटन डी कॉक अवघ्या दहा धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र सलामीला आलेल्या केएल राहुलने धमाकेदार खेळी करुन शतक झळकावले. राहुलने ६२ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि चार षटकार लगावत नाबाद १०३ धावा केल्या.
त्यांतर राहुल व्यतिरिक्त मनिष पाडेंने २२ धावा केल्या. त्यानंतर मात्र लखनऊच्या एकाही फलंदाजाला १५ पेक्षा जास्त धावा करता आल्या नाही. मार्कस स्टोईनिस (०), कृणाल पांड्या (१) स्वस्तात बाद झाले. तर दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांनी अनुक्रमे १० आणि १४ धावा करुन लखनऊला १६८ धावांपर्यंत घेऊन जाण्यास मदत केली. जेसन होल्डर नाबाद राहिला.
मुंबईला रोखण्यासाठी लखनऊच्या गोलंदाजांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. कृणाल पांड्याने किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट आणि डॅनियल सॅम्स अशा मुंबईच्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं. तर मोहसीन शेख, जेसन होल्डर, रवी बिश्नोई आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी एक बळी घेत मुंबई संघाला खिळखिळे केले.